मुख्यमंत्र्यांना तरुणाने लिहिले पत्र; केली अनोखी मागणी
बातमी मराठवाडा

मुख्यमंत्र्यांना तरुणाने लिहिले पत्र; केली अनोखी मागणी

मुंबई : कोरोना महामारीत अनेकांचे रोजगार गेले, एका झटक्यात व्यवहार ठप्प झाल्याने देशभरातील लोकांचे जनजीवन विस्कळीत झाले. लाखो लोकांनी स्थलांतर केले. या सर्व परिस्थितीत ग्रामीण भागाही भरडला गेला. या परिस्थितीत राज्यातील अनेकांनी राज्य सरकारला वेगवेगळ्या मार्गाने आपले गाऱ्हाणे सांगितले. मात्र अलीकडेच मुख्यमंत्र्यांना एक पत्र आले आहे, या पत्रातील मजकुरामुळे ते प्रचंड व्हायरल होत आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

वाशिममधील गजानन राठोड नावाच्या तरुणाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र पाठवून, ‘एकतर मला नोकरी द्या नाहीतर पोरगी पाहून माझं लग्न करून द्या,” अशी अजब गजब मागणी केली आहे. सध्या हे पत्र सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. याआधीही अनेकांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून आपल्या व्यथा कळवल्या होत्या, यात लहानग्या चिमुकल्यांनीही लिहिलेली पत्र भावनात्मक होती तर काहींची मागणी ऐकून हसू आवरत नव्हते.

काय लिहिले आहे गजाननने पत्रात?
या पत्रात गजानननं म्हटलंय की, माझं वय ३५ वर्ष असून माझं लग्न झालेलं नाही, त्याचं कारण गेल्या ७ वर्षापासून मी स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहे, परंतु कमी गुणांमुळे मला नोकरी मिळाली नाही, जिथे मुलगी बघायला जातो, तिथे मुलाला नोकरी असावी ही अट असते.तुम्ही आतापर्यंत नोकरीच्या जागा काढल्या नाहीत, त्यामुळे जॉब मिळणेही कठीण झालं आहे, त्यामुळे मला एकतर जॉब द्यावा अन्यथा माझे एखाद्या मुलीशी लग्न करून द्यावे.

मात्र, राज्यातील तरुणांनी असे पत्र लिहिल्याची ही पहिलीच वेळ नाही. दोन वर्षापूर्वी , बीडमधील एका तरूणाने मला एक दिवसाचा मुख्यमंत्री करा, अशी मागणी करणारं पत्र राज्यपाल भगतसिंह कोश्यारींना लिहिलं होतं. मराठवाड्याचे प्रश्न सोडवण्यासाठी या तरूणाने ही मागणी केली होती, तसेच त्याच्या मूळ गावापासून लालबागच्या राजापर्यंत दंडवत घालत पायी यात्राही काढली होती. हा तरूणही त्यावेळी जोरदार चर्चेत आला होता, आता वाशिमच्या युवकाने केलेल्या मागणीही जोरदार व्हायरल होत आहे.