दुर्गम भागातील नागरिकांच्या लसीकरणासाठी मुख्यमंत्र्यांचे स्थानिक प्रशासनाला महत्त्वाचे निर्देश
बातमी महाराष्ट्र

दुर्गम भागातील नागरिकांच्या लसीकरणासाठी मुख्यमंत्र्यांचे स्थानिक प्रशासनाला महत्त्वाचे निर्देश

नंदुरबार : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत नंदुरबार जिल्ह्याच्या धडगाव येथे जिल्हा आढावा बैठक पार पडली. या दौऱ्यादरम्यान, मोलगी येथील ग्रामीण रुग्णालयाला भेट देऊन लसीकरणाची माहिती घेतली. यावेळी जिल्ह्याच्या दुर्गम भागातील नागरिकांना कोरोना लसीकरणासाठी आवश्यक सर्व सुविधा योग्य प्रकारे मिळतील, याकडे विशेष लक्ष देण्यात यावे आणि लसीकरणानंतर देखील नागरिकांनी मास्कचा वापर आणि शारीरीक अंतराचे पालन करावे, यासाठी नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासंबंधी स्थानिक प्रशासनाला आदेश दिले.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

दुर्गम भागातील माझ्या माताभगिनी आणि बांधवाना कोरोना लसीकरणाची चांगली सुविधा मिळते का हे पाहण्यासाठी मोलगी येथून लसीकरण केंद्राच्या भेटीला सुरुवात करीत असल्याचे त्यांनी सांगितले. ते म्हणाले, लस घेताना कोणतीही भीती मनात बाळगू नका. कोरोनाचे संकट वाढत असले तरी सर्वांनी निश्चय केल्यास त्यावर मात करता येईल. लस घेतल्यानंतरही मास्कचा वापर आणि शारीरिक अंतराचे पालन सुरू ठेवा. आपण स्वतः लस घेतली असून त्याचा कोणताही परिणाम होत नसल्याने घाबरू नका, अशा शब्दात त्यांनी लसीकरणासाठी आलेल्या नागरिकांना विश्वास दिला.

मुख्यमंत्री ठाकरे पुढे बोलताना म्हणाले की, ”कोरोना संसर्ग वाढण्याची शक्यता असल्याने प्रतिबंधक उपाययोजनांवर विशेष भर देण्यात यावा. कोविडचा धोका पुन्हा वाढला आहे. मात्र यावेळी एक ढाल म्हणून लसीकरणाची सुविधा आपल्याकडे आहे. शहरी भागात आरोग्याच्या सुविधा उपलब्ध असतात परंतु ग्रामीण आणि विशेषत: दुर्गम भागातील नागरिकांना अशा सुविधा मिळणे आवश्यक आहे. लसीकरणाबाबत जनतेच्या मनातील शंका दूर करून लसीकरणाचा वेग वाढवावा. शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे सर्वत्र पालन होईल याकडे विशेष लक्ष द्यावे. जिल्ह्याने जनजागृतीचे चांगले उपक्रम राबविले असून त्यात यापुढेही सातत्य ठेवण्यात यावे, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

तर यावेळी पालकमंत्री के.सी. पाडवी म्हणाले, जिल्ह्यात फळबाग लागवड कार्यक्रम राबविल्यास 200 डोंगर हिरवे होतील. त्यासाठी ग्रामपंचायतीचा सहभाग घेता येईल. जिल्ह्यातील आश्रम शाळांमधून सॅटेलाईट एज्युकेशन राबविण्याचा मानस आहे. तर राज्यात मनरेगाच्या माध्यमातून यावर्षी विक्रमी फळबाग लागवड झाल्याचे कृषीमंत्री भुसे यांनी यावेळी सांगितले.