राज्यातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ५५ हजारांपेक्षा कमी; २४ तासांत ३२०ची भर
कोरोना इम्पॅक्ट बातमी

राज्यातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ५५ हजारांपेक्षा कमी; २४ तासांत ३२०ची भर

मुंबई : राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव काही प्रमाणात कमी झाला असला तरी धोका कमी झालेला नाही. कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंच्या संख्येतही भर पडत आहे. आजही राज्यातील अॅक्टिव्ह रुग्णांच्या संख्येत वाढ झाली असून ३२० रुग्णांची भर पडली आहे. आज दिवसभरात राज्यात ३ हजार ५८० नवे कोरोनाबाधित आढळले, तर ८९ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद झाली. शिवाय, ३ हजार १७१ जणांनी कोरोनावर मात केली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

राज्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या आता १९ लाख ९ हजार ९५१ झाली आहे. तर, सध्या राज्यात ५४ हजार ८९१ अॅक्टिव्ह केसेस असून, आतापर्यंत करोनावर मात केलेल्या १८ लाख ४ हजार ८७१ जणांना डिस्चार्जही मिळालेला आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी याबाबत ट्विट करत ही माहिती दिली आहे.

दरम्यान, त्रीच्या संचारबंदीवरून सुरू झालेल्या टीकेवर बोलताना मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिले असून अजूनही धोका टळलेला नाही, आता दोन दिवसांपासून नाईट कर्फ्यू सुरू झाला आहे. यावर अनेकांनी प्रश्न विचारले की, हा कोरोना काय रात्रीच मोकाट सुटतो व दिवसा घरात बसतो काय? तसं नाही, शेवटी एक छोटीशी जाणीव जनतेला करून देण्याची आवश्यकता असते. अजूनही आपल्याला बंधनांची आवश्यकता आहे. दिवसा लॉकडाउन आपण करू शकत नाही, तशी वेळ नाही आणि आपल्यावर तशी वेळ देखील येऊ नये. निदान रात्रीची संचारबंदी आहे म्हटल्यावर एक धोक्याची जाणीव असते. अनावश्यक गर्दी टाळणं हे फार महत्वाचं आहे. मास्क वापरणे, हात धुणे व सुरक्षित अंतर ठेवणे हे जर का आपण पाळलं, तर मला असं वाटतं आपण या संकटावर मात करू शकतो, असे मुख्यमंत्री ठाकरे यांनी म्हटले आहे.