एमडीएचचे मालक धर्मपाल गुलाटी ९८व्या वर्षी काळाच्या पडद्याआड
देश बातमी

एमडीएचचे मालक धर्मपाल गुलाटी ९८व्या वर्षी काळाच्या पडद्याआड

नवी दिल्ली : एमडीएच मसाले कंपनीचे मालक महाशय धर्मपाल गुलाटी यांचं ९८ व्या वर्षी निधन झाले. गुलाटी यांच्यावर दिल्लीतील रुग्णालयामध्ये मागील तीन आठवड्यांपासून उपचार सुरु होते. त्यांना आज पहाटेच्या सुमारास वृद्धापकाळानं ह्रदय बंद पडून त्यांचं निधन झालं. याबाबतचे अधिकृत वृत्त एएनआयने दिले आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

महाशय धर्मपाल गुलाटी यांचा जन्म पाकिस्तानमधील सियालकोट येथे झाला होता. फाळणीनंतर त्यांचे कुटुंब दिल्लीत स्थायिक झाले. त्यानंतर मसाल्यांचा उद्योग त्यांनी सुरु केला. आज भारतातच नव्हे तर जगभरात एमडीएच मसाले हा एक मोठा नावाजलेला ब्रँड आहे. गेल्या अनेक वर्षांपासून महाशियां दी हट्टी ही मसाल्याच्या पदार्थांचे उत्पादन करणारी कंपनी एमडीएच या नावाने प्रसिद्ध आहे.

चुन्नीलाल गुलाटी यांच्या अथक प्रयत्नांमुळे एमडीएच कंपनीने मसाल्याच्या पदार्थांमध्ये बाजारात एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. भारतात मसाल्यांच्या १५ कंपन्या आहेत. १००० च्या वर पुरवठादार आणि ४ लाख घाऊक विक्रेते एवढं मोठं जाळं एमडीएचने विस्तारलेलं आहे. अमेरिका, कॅनडा, जपान, संयुक्त अरब अमिरात, इंग्लंड, युरोप, दक्षिण पूर्व आशिया, सौदी अरेबिया आदी देशांत ६२ हून अधिक उत्पादनांची विक्री होते. अवघ्या १५०० रुपयांत सुरु झालेला हा व्यवसाय आज कोट्यांची उलाढाल करतोय. महाशय धरमपाल गुलाटी यांचे पुत्र राजीव गुलाटी आता व्यवसायाचा हा पसारा समर्थपणे पुढे नेत आहेत.