नरेंद्र मोदींच्या हस्ते देशव्यापी कोरोना लसीकरण मोहिमेला सुरवात
देश बातमी

नरेंद्र मोदींच्या हस्ते देशव्यापी कोरोना लसीकरण मोहिमेला सुरवात

नवी दिल्ली : गेल्या अनेक महिन्यांपासून प्रतीक्षेत असणाऱ्या देशव्यापी कोरोना लसीकरणाला आजपासून सुरुवात झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या लसीकरण मोहिमेचा प्रारंभ झाला. यावेळी पंतप्रधानांनी देशवासीयांचं अभिनंदन करत संबोधित केलं. पंतप्रधान म्हणाले,”काही वेळात देशात जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम सुरू होत आहे. यासाठी मी देशवासीयांचं अभिनंदन करतो. ज्याला सगळ्यात जास्त गरज आहे, त्याला सगळ्यात आधी कोरोना लस मिळेल,” असं मोदी यांनी स्पष्ट केलं. तसेच, ‘दवाई भी, कड़ाई भी’, असा नवीन नारा यावेळी मोदींनी दिला.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

यावेळी बोलताना पंतप्रधान मोदींनी वैज्ञानिक आणि लस विकसित करण्यात महत्त्वाची भूमिका निभावलेल्या कर्मचाऱ्यांचं कौतुक केलं. “गेल्या अनेक महिन्यांपासून कोरोना लस बनवण्यात व्यस्त असलेले वैज्ञानिक, लस बनवणारे कर्मचारी कौतुकासाठी पात्र आहेत. सामान्यत: एक लस बनण्यासाठी अनेक वर्षे लागतात. पण एवढ्या कमी वेळात एक नाही तर दोन मेड इन इंडिया लस बनवल्या,” असं मोदी म्हणाले.

पंतप्रधान मोदी म्हणाले,”भारतातील लसीकरण अभियान मानवीय आणि महत्त्वाच्या सिद्धांतावर आधारित आहे. त्यामुळे लसीकरणाची ज्याला सर्वात जास्त गरज आहे, त्याला सर्वात आधी लस दिली जाईल. ज्याला कोरोना होण्याचा धोका सर्वाधिक आहे, त्या व्यक्तींना सर्वात आधी लस मिळेल. आपले डॉक्टर, नर्स, सफाई कर्मचारी, आरोग्य सेवेतील कर्मचारी यांना सगळ्यात आधी लस दिली जाईल. या सर्वांचा कोरोना लसीवर पहिला हक्क आहे. त्यानंतर अत्यावश्यक सेवा आणि कायदा सुव्यस्थेची जबाबदीर असणाऱ्या लोकांना लस दिली जाईल,” असं मोदी म्हणाले.

पंतप्रधान पुढे म्हणाले की, पहिल्या आणि दुसऱ्या डोसमध्ये एका महिन्याचं अंतर असेल. दुसरा डोस घेतल्यानंतर २ आठवड्यांनी आपल्या शरीरात कोरोना प्रतिबंधात्मक शक्ती निर्माण होईल. पहिल्या टप्प्यात तीन कोटी कोविड योद्ध्यांना लस देण्यात येईल. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात ३० कोटी नागरिकांना करोनाची लस देण्यात येईल. ज्येष्ठ नागरिक, गंभीर आजारांनी ग्रस्त असलेल्यांना दुसऱ्या टप्प्यात लस दिली जाईल. तुम्ही कल्पना करू शकता की, ३० कोटीपेक्षा जास्त लोकसंख्या असलेले फक्त तीनच देश आहे. चीन, अमेरिका आणि भारत,” असं मोदी म्हणाले.