पद्मभूषण राजन मिश्र यांचं दिल्लीत निधन
देश बातमी

पद्मभूषण राजन मिश्र यांचं दिल्लीत निधन

नवी दिल्ली : प्रसिद्ध शास्त्रीय गायक पद्मभूषण राजन मिश्र यांचे आज (ता. २५) सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास दिल्लीत निधन झाले. कोरोना संसर्गाबरोबरच हृदयविकाराशी संबंधित त्रास उद्भवल्याने आज सकाळी त्यांची तब्येत खालवली होती, यामुळे त्यांना दिल्लीतील सेंट स्टीफन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. सलीम मर्चंट यांनी ट्विटरवर राजन मिश्र यांच्या निधनाची माहिती दिली.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील राजन मिश्र यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. राजन मिश्र यांचा जन्म १९५१ मध्ये झाला आणि वाराणसीमध्येच ते आपल्या भावासोबत लहानाचे मोठे झाले. त्यांनी त्यांचे वडील हनुमान प्रसाद मिश्र यांच्यासह आजोबा व काकांकडून संगीताचे प्रशिक्षण घेतले.

राजन मिश्र हे प्रसिद्ध शास्त्रीय गायक होते. त्यांना २००७ मध्ये भारत सरकारद्वारे कला क्षेत्रासाठी पद्मभूषण देऊन सन्मानित करण्यात आलं होतं. त्यांचा बनारस घरण्याशी संबंध होता. त्यांनी १९७८ मध्ये श्रीलंकेत आपला पहिला संगीत कार्यक्रम केला आणि त्यानंतर जर्मनी, फ्रान्स, स्वित्झर्लंड, ऑस्ट्रिया, अमेरिका, ब्रिटन, नेदरलॅण्ड, यूएसएआर, सिंगापूर, कतार, बांगलादेशसह जगभरातील अनेक देशांमध्ये कार्यक्रम सादर केले. राजन आणि साजन मिश्र हे दोघे भाऊ सोबत कार्यक्रम सादर करत, त्याद्वारे त्यांनी जगभरात प्रसिद्धी मिळवली.