अमेरिकेची फायजर कंपनी भारताला लसपुरवठा करण्यात तयार; पण घातली ही अट
बातमी विदेश

अमेरिकेची फायजर कंपनी भारताला लसपुरवठा करण्यात तयार; पण घातली ही अट

नवी दिल्ली : भारतामध्ये करोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असून भारतात कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या लसींच्या माध्यमातून लसीकरण मोहिम चालू आहे. मात्र, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत परिस्थिती फारशी समाधानकारक नसून चिंताजनक होत चालली आहे. याच पार्श्वभूमीवर सरकारने आता इतर देशांमधून लसी विकत घेण्यासाठी तयारी सुरु केली आहे. अमेरिकेतील फायजर कंपनीने भारताला लस देण्याची तयारी दर्शवली असली तरी मात्र एक अट घातली आहे. फायजरने भारतात देण्यात येणाऱ्या लसी या केवळ सरकारी पुरवठा साखळीच्या माध्यमातून दिल्या जातील असं स्पष्ट केलं आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

म्हणजेच, बायोटेकच्या मदतीने विकसित करण्यात आलेल्या अमेरिकेतील फायजर ही लस भारतामध्ये केवळ सरकारी रुग्णालयांमध्ये उपलब्ध होणार असल्याचं सांगितलं जात आहे. कंपनीच्या प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोना बाधितांची वाढती संख्या पाहून फायजर आपल्या लसीकरण मोहिमेअंतर्गत प्राधान्याने सरकारी यंत्रणेला लस पुरवठा करणार आहे. केवळ सरकारी कंत्राटाद्वारेच कंपनी भारतामध्ये करोना लसींचा पुरवठा करणार आहे.

फायजरच्या लसीची किंमत ४० डॉलर म्हणजेच तीन हजार रुपयांपर्यंत असण्याची शक्यता आहे. भारतामधील कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन लसींची किंमत ३०० रुपयांपर्यंत आहेत. तत्पूर्वी, लसीकरणाच्या बाबतीत भारताने चीन आणि अमेरिकेला मागे टाकत पहिला क्रमांकांवर झेप घेतली आहे. मागील ९२ दिवसांमध्ये भारतात १२ कोटी २६ लाखांहून अधिक जणांना कोरोना लस देण्यात आली आहे. अमेरिकेमध्ये इतकं लसीकरण करण्यासाठी ९७ तर चीनमध्ये १०८ दिवस लागले होते.