मळेघरवाडी बलात्कारप्रकरणी शंभूराज देसाईंनी घेतली पिडीत कुटुंबाची भेट
बातमी महाराष्ट्र

मळेघरवाडी बलात्कारप्रकरणी शंभूराज देसाईंनी घेतली पिडीत कुटुंबाची भेट

अलिबाग : पेण मळेघरवाडी प्रकरणामध्ये आवश्यक ती चौकशी करून, जास्तीत जास्त पुरावे गोळा करून लवकरात लवकर परिपूर्ण आरोपपत्र दाखल केले जाईल, जेणेकरून आरोपीस जास्तीत जास्त कडक शिक्षा होईल, असे प्रतिपादन रोजगार व उद्योजकता, पणन राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी केले आहे. पेण येथील मळेघरवाडी येथे एका तीन वर्षांच्या बालिकेची बलात्कार करून हत्या केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी पेण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी एका आरोपीला ताब्यात घेतले.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

या घटनेनंतर, आज सकाळी त्यांनी पेण येथे पीडित बालिकेच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेण्यासाठी गृह (ग्रामीण), वित्त राज्यमंत्री शंभूराज देसाई हे पीडित बालिकेच्या कुटुंबियांच्या घरी आले असता ते बोलत होते. यावेळी गृह (ग्रामीण), वित्त राज्यमंत्री शंभूराज देसाई म्हणाले की, पेण मळेघरवाडी येथील घटना ही निश्चितच अत्यंत दुर्दैवी घटना आहे. या प्रकरणाचा तपास काटेकोरपणे पूर्ण करुन लवकरात लवकर दोषारोपपत्र दाखल करण्यात येईल.

हे प्रकरण जलदगती न्यायालयात चालविण्यात येणार असून या खटल्यासाठी प्रख्यात ज्येष्ठ विधीज्ञ ॲड. उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. तर पीडितेच्या कुटुंबियांना या घटनेतून सावरण्यासाठी शासनाच्या मनोधैर्य योजना व दक्षता समितीच्या माध्यमातून पीडित बालिकेच्या कुटुंबाला तात्काळ मदत करण्याचे त्याचबरोबर पीडित कुटुंबाच्या राहत्या घराची परिस्थिती पाहून ते घर शासनाच्या योजनेतून परिपूर्ण बांधून देण्याची आवश्यक ती कार्यवाही त्वरित करावी, असे त्यांनी जिल्हाधिकारी निधी चौधरी यांना निर्देश दिले.

दरम्यान, आंध्र प्रदेशातील दिशा कायद्याच्या धर्तीवर राज्यातही ‘शक्ती’ कायदा लागू करण्यासाठी यंदाच्या हिवाळी अधिवेशनात गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दोन विधेयके सादर केली. या विधेयकात महिला आणि बालकांबद्दल आक्षेपार्ह मजकूर आणि छायाचित्र टाकणे यासाठी मृत्युदंड आणि १० लाख रुपयांपर्यंतच्या दंडाची तरतूद आहे.

महिला व बालकांवरील अत्याचाराच्या गुन्ह्यांमध्ये मृत्युदंडापर्यंतच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. २१ दिवसांमध्ये खटल्याचा निकाल, बलात्कार, अ‍ॅसिडहल्ला आणि बालकांवरील अत्याचारांच्या गंभीर गुन्ह्यांमध्ये मृत्युदंडांची तरतूद हे या कायद्याचे वैशिष्ट्य आहे. विश्वासू किंवा जवळच्या व्यक्तीने बलात्कार केल्याचे सिद्ध झाल्यास मृत्युदंड आणि १६ वर्षांखालील मुलीवर बलात्कार, सामूहिक बलात्कार या गुन्ह्यांतही मृत्युदंडाची तरतूद या विधेयकात आहे. या कायद्यामुळे गुन्हेगारांना वचक बसेल.’ असा विश्वासही यावेळी गृहमंत्र्यांनी व्यक्त केला.