धक्कादायक! इंडोनेशियात विमानाचा अपघात; ६२ प्रवाशांना जलसमाधी
बातमी विदेश

धक्कादायक! इंडोनेशियात विमानाचा अपघात; ६२ प्रवाशांना जलसमाधी

इंडोनेशियाची राजधानी जकार्ताहून उड्डाण केलेल्या श्रीविजया देशांतर्गत विमानाचा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. या विमानात ५० प्रवाशी आणि १२ कर्मचारी होते. विमानाने उड्डाण केल्यानंतर अवघ्या चार मिनिटात विमानाचा नियंत्रण कक्षाशी संपर्क तुटला आणि हे विमान समुद्रात कोसळलं. श्रीविजया एयर बोइंग 737चा जकार्ताच्या कलिमनतन प्रांतातल्या रस्त्यात संपर्क तुटल्याची माहिती समोर आली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

बुदी कारया सुमादी यांनी स्थानिक प्रसारमाध्यामांनी या घटनेची माहिती दिली आहे. यानुसार, एसजे १८२ या विमानाने नियोजित वेळेपेक्षा एक तास विलंबाने म्हणजेच स्थानिक वेळेनुसार दोन वाजून ३६ मिनिटांने उड्डाण केले. त्यानंतर चार मिनिटांनी हे विमान रडार यंत्रणेवरुन गायब झाले. त्यापूर्वी वैमानिकाने हवाई नियंत्रण कक्षाशी संपर्क साधून विमान समुद्रसपाटीपासून २९ हजार फुटांवर असल्याची माहिती दिली होती. तसेच, बोइंग ७३७-५०० या विमानाचे १:५६ वाजता जकार्ताहून उड्डाण झाले आणि २:४० वाजता त्या विमानाचा नियंत्रण मनोऱ्याशी संपर्क तुटला, अशी माहिती इंडोनेशियाच्या परिवहन मंत्रालयाच्या प्रवक्त्या अदिता इरावती यांनी दिली.

त्यानंतर, मच्छिमारांना समुद्रात विमानाचे काही अवशेष मिळाले आहेत. तसेच शरीराचे अवयव, कपडे आणि इतर काही विमानातील गोष्टींही मिळाल्या आहेत. या सर्वांना पुढील तपासासाठी इंडोनेशियाच्या आधिकाऱ्यांकडे सपूर्द करण्यात आलं आहे. यावरुन विमानातील सर्वांचा मृत्यू झाल्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे. नौदलातील चालक असलेल्या 10 हून अधिक बोटी विमान कोसळल्याच्या ठिकाणाकडे रवाना झाल्या आहेत.

दरम्यान, एका प्रत्यक्षदर्शीनं एका मोठा आवाज ऐकल्याचं सांगितलं. सोलिहिन नावाच्या एका मच्छीमारानं बीबीसीच्या इंडोनेशियन सर्व्हिसशी बोलताना म्हटलं की, त्यांनी हा अपघात होताना पाहिला. त्यानंतर त्यांनी त्यांच्या कॅप्टनसोबत बेटावर परतण्याचा निर्णय घेतला. त्यांनी म्हटलं, “विमान विजेच्या वेगानं समुद्रात कोसळलं आणि मोठा आवाज झाला. आम्ही जवळच होतो. काही तुकडे आमच्या जहाजावरही येऊन आदळले.”

जकार्ताच्या उत्तरेकडे असलेल्या लॅनकँग आणि लाकी बेटांमध्ये शोध आणि मदतकार्यासाठी चार युद्धनौकांसह १२ जहाजे तौनात करण्यात आली, असे सुमादी म्हणाले. तर मच्छीमारांना मिळालेले विमानाचे अवशेष आणि कपडे राष्ट्रीय शोध आणि मदतकार्य यंत्रणेच्या कर्मचाऱ्यांनी ताब्यात घेतले असून ते राष्ट्रीय परिवहन सुरक्षा समितीकडे पुढील तपासासाठी सुपूर्द करण्यात आले आहेत. ऑस्ट्रेलियाच्या उपग्रह यंत्रणेलाही बेपत्ता विमानाचे ईएलटी सिंग्नल पकडता आले नाही, असे आधिकाऱ्यांनी सांगितले.