धक्कादायक! महाराष्ट्रासह भारतातील ‘या’ राज्यातही वाढतोय कोरोनाबाधितांचा आकडा
देश बातमी

धक्कादायक! महाराष्ट्रासह भारतातील ‘या’ राज्यातही वाढतोय कोरोनाबाधितांचा आकडा

भारतात सध्याच्या घडीला १ लाख ४३ हजार १२७ करोना रुग्ण उपचाराधीन आहेत. तर गेल्या काही दिवसांपासून मुंबई आणि महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. पण फक्त महाराष्ट्रच नाही, तर देशाच्या अन्य राज्यातही कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत आहे. मागच्या आठवड्याभरात महाराष्ट्रात अचानक कोरोना रुग्णवाढ दिसून आली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे सरकारला राज्याच्या काही भागात निर्बंध लागू करावे लागले आहेत. इतकेच नव्हे तर, मागच्या आठवडयात केरळ, महाराष्ट्र, पंजाब, छत्तीसगड आणि मध्य प्रदेश या राज्यांमध्ये करोना रुग्णांची संख्या वाढल्याचे दिसून आले.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी संपूर्ण देशामध्ये फक्त महाराष्ट्रात सर्वाधिक करोना रुग्णांची नोंद झाली. मागच्या २४ तासात ६,११२ नव्या करोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर पंजाबमध्येही मागच्या आठवड्याभरात अचानक रुग्णवाढ होत असून मागच्या २४ तासात पंजाबमध्ये ३८३ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. छत्तीसगडमध्ये करोना रुग्णांचा आकडा वाढतोय. मागच्या २४ तासात तिथे २५९ नव्या करोना रुग्णांची नोंद झाल्याचे केंद्राने म्हटले आहे.

मागच्या सात दिवसात केरळमध्ये मोठया संख्येने करोना रुग्णांची नोंद होतेय. तसेच, कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी कोरोना नियमांचे पालन आवश्यक आहे. देशभरातील अ‍ॅक्टीव्ह कोरोना केसेसपैकी फक्त महाराष्ट्र आणि केरळ या दोन राज्यातूनच ७५.८७ टक्के कोरोना रुग्ण आहेत. तर मागच्या २४ तासात देशातील १८ राज्य आणि केंद्रशासित प्रदेशामध्ये कोरोनामुळे एकही मृत्यू झाल्याची नोंद नाही. असेही आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.