ज्याने तिरंग्याचा अपमान केला, त्याला पकडावं; राकेश टिकैत यांचा नरेंद्र मोदींवर पलटवार
देश बातमी

ज्याने तिरंग्याचा अपमान केला, त्याला पकडावं; राकेश टिकैत यांचा नरेंद्र मोदींवर पलटवार

नवी दिल्ली : प्रजासत्ताक  दिनी झालेल्या हिंसाचारात तिरंग्याचा अपमानामुळे संपूर्ण देश दुःखी झाला.” अशी खंत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘मन की बात’ कार्यक्रमातून देशवासीयांशी संवाद साधला. नव्या वर्षातील पहिल्या ‘मन की बात’मध्ये मोदींनी देशभरातील वेगवेगळ्या घटनांबद्दल भाष्य केलं होतं. या मुद्द्यावरून भारतीय किसान युनियनचे प्रवक्ता राकेश टिकैत यांनी निशाणा साधला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

तर पंतप्रधानांच्या या विधानावरून शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी मोदींवर टीका केली. टिकैत म्हणाले, ”सर्व देश तिरंग्यावर प्रेम करतो. ज्याने तिरंग्याचा अपमान केला आहे, त्याला पकडावं,” अशा शब्दात टिकैत यांनी मोदी यांच्यावर पलटवार केला. कृषी कायद्यांवरून शेतकरी व सरकारमध्ये पुन्हा चर्चा करण्याबद्दलही टिकैत यांनी भूमिका मांडली. “कोणतीही चर्चा दडपणाखाली होणार नाही. आम्ही या विषयावर चर्चा करू. ते आमचेही पंतप्रधान आहेत. त्यांनी घेतलेल्या पुढाकाराबद्दल आम्ही आभारी आहोत. त्यांनी आमच्या लोकांना सोडावं, अशी आमची इच्छा आहे. आम्ही त्यांचा आदर करू,” असं टिकैत म्हणाले.

मन की बात मध्ये बोलताना पंतप्रधान म्हणाले की, ”भारताने कोरोनाविरोधात दिलेली लढाई जसं जगासमोर एक उदाहरण ठरलं, तसंच आता लसीकरणही ठरतंय. आपल्याला येणाऱ्या काळाला नवीन आशा व नाविन्याने भरायचं आहे. आपण मागील वर्षी असाधरण संयम व धैर्याचा परिचय दिला. या वर्षात देखील कठोर मेहनत घेऊन आपल्याला संकल्प पूर्ण करायचे आहेत. आपल्या देशाला अधिक गतीने पुढे न्यायचं आहे.” असं देखील यावेळी मोदी म्हणाले.

दरम्यान, “आंदोलक शेतकऱ्यांनी उपस्थित केलेले प्रश्न चर्चेच्या माध्यमातून सोडवण्याचा प्रयत्न केंद्र सरकार वारंवार करीत आहे. तिन्ही कृषी कायदे स्थगित ठेवण्याचा सरकारचा प्रस्ताव आजही कायम आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत सरकारचा दृष्टिकोन स्पष्ट आहे. शेतकऱ्यांनी केवळ एक दूरध्वनी करावा, आम्ही त्यांच्याशी चर्चा करण्यास तयार आहोत,” असं मोदी यांनी शनिवारी झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत स्पष्ट केलं होतं.