अमेरिकेच्या माघारीनंतर काबूल विमानतळावर तालिबानचा ताबा
बातमी विदेश

अमेरिकेच्या माघारीनंतर काबूल विमानतळावर तालिबानचा ताबा

काबूल : काबूलमधून अमेरिकेने सैन्य माघारी घेतल्यानंतर मंगळवारी काबूल आंतरराष्ट्रीय विमानतळाचा तालिबानने ताबा घेतला. अमेरिकेचे शेवटचे विमान धावपट्टीवरून उडाल्यानंतर तालिबानने विमानतळ ताब्यात घेतले. असे असले तरी काही अफगाणी लोक अजूनही परदेशात जाण्याच्या विचारात आहेत.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

हमीद करजाई विमानतळावर एकच धावपट्टी असून विमानतळाच्या लष्करी भागाकडे काही वाहने उभी होती. तालिबानी नेत्यांनी सांगितले की, आमच्या माजी विरोधकांना आम्ही सार्वत्रिक माफी दिली आहे. धावपट्टीवर बद्री गटाचे नेते व काही कमांडो दिसत होते. तालिबानच्या लोकांनी विमानतळावरील हँगर्सची तपासणी केली. पहाट होण्यापूर्वीच त्यांनी ही कामगिरी केली. त्यांना तेथे परराष्ट्र खात्याची सीएच ४६ प्रकारची सात हेलिकॉप्टर्स सापडली. तालिबानचे नेते प्रतीकात्मक पद्धतीने धावपट्टीवर चालले व त्यांनी विजयाचा आनंद व्यक्त केला. जगाने यातून धडा शिकण्याची गरज असून विजयाचा हा आनंद मोठा आहे, असे तालिबानचा प्रवक्ता झबीहउल्ला मुजाहिद याने म्हटले आहे.

दरम्यान, अमेरिकेने अफगाणिस्तानातील त्यांचा दूतावास कतारला हलवला आहे. अमेरिकेने वीस वर्षे सुरू असलेल्या युद्धाची समाप्ती मंगळवारी केली असल्याने हा निर्णय घेण्यात आला असे प्रतिपादन अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँटनी ब्लिंकन यांनी केले आहे.