खडसेंचा भाजपला झटका; 18 विद्यमान तर 13माजी नगरसेवकांचा राष्ट्रवादीत प्रवेश
राजकारण

खडसेंचा भाजपला झटका; 18 विद्यमान तर 13माजी नगरसेवकांचा राष्ट्रवादीत प्रवेश

भुसावळ : राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी भाजपला मोठा झटका दिला असून भुसावळमध्ये नगरसेवकांची मेगा भरतीच घेतली आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांच्या उपस्थितीत भाजपच्या 18 विद्यमान नगरसेवक आणि 13 माजी नगरसेवकांनी सहकुटुंब राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. भाजपला आतापर्यंतच सर्वात मोठा धक्का समजला जात आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

भाजपला पहिला मोठा धक्का खडसेंनी दिला आहे. शहरातील सरदार वल्लभभाई पटेल सभागृहात प्रवेशाचा कार्यक्रम झाला. माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या नेतृत्वावर विश्‍वास ठेवत एकूण 31 जणांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे चिन्ह असलेले मफलर घालून प्रवेश केलेल्या नगरसेवकांचा सत्कार केला. भाजपचे जिल्हा सरचिटणीस प्रा. डॉ. सुनिल नेवे, नगराध्यक्ष रमण भोळे यांच्या पत्नी भारती भोळे, नगरसेविका पती देवा वाणी, भाजपचे माजी अध्यक्ष दिनेश नेमाडे, आणि आजी माजी नगरसेवकांनी प्रवेश केला.

या प्रवेशामुळे भाजपला मोठा धक्का मानला जात आहे. याआधीही भाजपचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी भाजपला रामराम ठोकून राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. दरम्यान, यावेळी बोलत असताना जयंत पाटील यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. ‘गोपीनाथ मुंडे व एकनाथ खडसे यांच्यामुळे भाजप हा बहुजनांचा पक्ष आहे म्हणून अशी ओळख निर्माण झाली. त्यामुळे महाराष्ट्रात प्रतिसाद त्यांना मिळायला लागला त्यामुळे भाजपला सत्ता स्थापन करता आली’ असं जयंत पाटील म्हणाले.