चोहीबाजूने टीका झाल्यानंतर अखेर तो निर्णय अजित पवारांकडून रद्द
राजकारण

चोहीबाजूने टीका झाल्यानंतर अखेर तो निर्णय अजित पवारांकडून रद्द

मुंबई : जाहिराती आणि प्रसिद्धीसाठी सोशल मीडियावर 6 कोटी रुपये खर्च करण्याचा निर्णय चोहीबाजूने टीका झाल्यानंतर अखेर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हा निर्णय मागे घेतला आहे. उपमुख्यमंत्री कार्यालयासाठी स्वतंत्र सोशल मिडिया यंत्रणेची गरज नाही म्हणत बाह्ययंत्रणा नियुक्तीचा शासन निर्णय रद्द करण्याचे निर्देश पवारांनी दिले आहेत.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

उपमुख्यमंत्री कार्यालयाचा सोशल मिडीया सांभाळण्यासाठी बाह्ययंत्रणा नियुक्त करण्याची बिलकूल गरज नाही, यासंदर्भातील शासननिर्णय तात्काळ रद्द करावा, असे निर्देशात म्हटले आहे. उपमुख्यमंत्री कार्यालयाला समाजमाध्यमांवर स्वतंत्रपणे कार्यरत राहण्याची गरज वाटत नाही. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या माध्यमातून शासकीय जनसंपर्काची जबाबदारी पार पाडणे शक्य असताना उपमुख्यमंत्री कार्यालयाच्या समाजमाध्यमांची जबाबदारी बाह्ययंत्रणेवर सोपवण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. सद्यस्थितीत उपलब्ध जनसंपर्क व्यवस्थेद्वारेच यापुढेही नागरिकांशी, प्रसिद्धी माध्यमांशी संवाद ठेवण्यात येईल, असेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्यालयासाठी स्वतंत्र समाज माध्यमयंत्रणा नियुक्त करण्यासाठीचा शासननिर्णय काल जारी झाला होता. उपमुख्यमंत्री अजित पवार हे अनावश्यक प्रसिद्धीपासून दूर राहत असल्यामुळे या शासन निर्णयाबद्ल आश्चर्य व्यक्त करण्यात येत होते. आता खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच त्यांच्या कार्यालयासाठी स्वतंत्र सोशल मिडीया सांभाळणाऱ्या यंत्रणेची गरज नसल्याचे स्पष्ट केले असल्याने यासंदर्भातील शासन निर्णय रद्द करण्यात येणार आहे, असेही या निर्देशात म्हटले आहे.