इतक्या मोठ्या संख्येने आंदोलन करणारे शेतकरी वेडे आहेत का?; कमलनाथांनी भाजपाला सुनावले
राजकारण

इतक्या मोठ्या संख्येने आंदोलन करणारे शेतकरी वेडे आहेत का?; कमलनाथांनी भाजपाला सुनावले

“इतक्या मोठ्या संख्येने आंदोलन करण्यासाठी येथे उपस्थित असलेले शेतकरी वेडे आहेत का? आमच्यावर आरोप करणाऱ्यांनी हे लक्षात ठेवायला हवं की ३० वर्षांपूर्वीचे शेतकरी आणि सध्याचे शेतकरी यांच्यात खूप फरक आहे. हल्लीचा शेतकरी हा सुशिक्षित आहे. त्याला आसापस घडणाऱ्या गोष्टींची अगदी नीट माहिती असते.” अशा शब्दात मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री आंनी कॉंग्रेसनेते कमलनाथ यांनी भाजपाचा सुनावले आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी विरोधी पक्षांनी ‘भारत बंद’ची हाक दिली असून देशभरात बंद पाळला जात आहे. साध्या भोळ्या शेतकऱ्यांना कोणत्याही गोष्टीची नीट माहिती न देता त्यांची दिशाभूल केली जात असल्याचा आरोप केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नकवी यांनी केला. त्या आरोपावर काँग्रेस नेते आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी उत्तर दिलं.

यावेळी बोलताना कमलनाथ म्हणाले की, केंद्र सरकारने शेतकर्‍यांचा सल्ला घेतल्याशिवाय कृषी कायदा लागू केला. यामुळे सरकारला आज अडचणीचा सामना करावा लागत आहे. एकीकडे केंद्र सरकार शेतकर्‍यांचे उत्पन्न दुप्पट करण्याविषयी बोलते आहे. दुसरीकडे या काळा कायद्यांची अंमलबजावणी करून शेतकऱ्यांचे नुकसान करायचे आहे. शेती तोट्याचा व्यवसाय करण्याकडे त्यांचा कल आहे. केंद्र सरकार हुकूमशहा पद्धतीने शेतकर्‍यांवर हे कायदे लादत आहे.

दिल्लीच्या वेशीवर कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी वेढा दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने केलेल्या शेतकरी कायद्यांविरोधात दिल्लीत गेल्या अनेक दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. केंद्र सरकारचे मंत्री आणि शेतकरी यांच्यात झालेल्या बैठकांमधून अद्याप तोडगा निघालेला नाही. अशातच केंद्र सरकार आणि शेतकऱ्यांमध्ये सलग चर्चा सुरु आहेत.

तसेच सरकारकडून यावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. पाचवी बैठक निष्फळ ठरल्यानंतर आता शेतकरी संघटना आणि केंद्र सरकारमध्ये सहावी बैठक उद्या म्हणजेच, 9 डिसेंबरला होणार आहे. असं म्हटलं जात आहे की, यावेळी शेतकरी आपली मागण्यांवर ठाम राहणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मागण्यांपुढे केंद्र सरकार नमतं घेणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.