आम्ही सामना वाचत नाही अन् संजय राऊतांकडे लक्षही देत नाही- नाना पटोले
राजकारण

आम्ही सामना वाचत नाही अन् संजय राऊतांकडे लक्षही देत नाही- नाना पटोले

मुंबई : महाराष्ट्रातील महाविकासआघाडीमध्ये सातत्याने कशावरून तरी वाद होताना दिसत आहेत. अशात आता शिवसेना खासदार संजय राऊत आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यात शाब्दिक चकमक सुरु झाली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

राष्ट्रीय पातळीवर विरोधकांची भक्कम अशी नवीन आघाडी निर्माण होण्याची गरज आहे. असं वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना केलं होतं. शिवाय, पश्चिम बंगालमध्ये काँग्रेसला आलेल्या अपयाशाबाबतही ते बोलले होते. राऊतांच्या या वक्तव्यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊतांकडे आम्ही लक्ष देत नाही, अन् त्यांचा सामनादेखील वाचत नाही, असं नाना पटोलेंनी म्हटलं आहे.

संजय राऊत काय बोलतात याच्याकडे आमचं लक्षदेखील नाही. जे काही आम्हाला त्यांना सांगायचं होतं ते अगोदरच आम्ही सांगितलेलं आहे. त्यांचा सामना वाचणं देखील आम्ही बंद केलं आहे. त्यामुळे माध्यमांद्वारे आम्ही स्पष्ट सांगितलं आहे. ज्या ठिकाणी आमच्या नेत्यावर, संघटनेवर टीका करण्याचा प्रयत्न होत असेल, तर त्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं तर बरं, अशा पद्धतीची आमची भूमिका आहे. पण दुसऱ्यावर टीका करून आपला पक्ष मोठा होतो असं कोणाला वाटत असेल, तर आपल्याकडे चार बोटं आहेत हे त्यांनी लक्षात ठेवावं. असं नाना पटोले यांनी म्हटलं आहे.