नितीश कुमारांना भाजपनेच दिला मोठा झटका; 6 आमदार लावले गळाला
राजकारण

नितीश कुमारांना भाजपनेच दिला मोठा झटका; 6 आमदार लावले गळाला

पाटणा : भारतीय जनता पक्षाने बिहारमध्ये आपला मित्रपक्ष असलेल्या जनता दल युनायटेड पक्षाला मोठा झटका दिला आहे. अरुणाचल प्रदेशमध्ये भाजपने जदयूचे 6 आमदार फोडले आहेत. त्यामुळे अरुणाचल प्रदेशात राजकीय भूकंप होण्याची दाट शक्यता आहे. जदयुचे एकूण सात आमदार होते, आता त्यांच्याकडे अरुणाचल प्रदेशमध्ये केवळ एकच आमदार शिल्लक राहिला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

सातपैकी सहा आमदार फुटले असल्याने पक्षांतरबंदी कायदाही लागू होत नाही. यावर जदयुचे राष्ट्रीय प्रमुख नीतीश कुमार यांनी मात्र मौन धारण केलं आहे. त्यांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. अरुणाचल प्रदेशात आलेल्या राजकीय भूकंपाचा परिणाम बिहारच्या राजकारणावरही होऊ शकतो, अशी जोरदार चर्चा आता सुरू झाली आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांत नितीश कुमार मोठा निर्णय देखील घेऊ शकतात, असंही समजतं. जदयूला आता बिहारमध्ये मित्रपक्ष असलेल्या भाजपने दगा दिला आहे. जदयुचे 6 आमदार आपल्याकडे ओढून भाजपनं नितीश कुमार यांना जोर का झटका दिला आहे.

भाजपच्या गोटात सामील झालेले सहा आमदार
भाजपच्या गोटात सामील झालेल्यांमध्ये रमगोंगचे आमदार तालीम तबोह, चायांग्ताजोचे आमदार हेयेंग मंग्फी, तालीचे आमदार जिकके ताको, कलाक्तंगचे आमदार दोरजी वांग्दी खर्मा, बोमडिलाचे आमदार डोंगरू सियनग्जू आणि मारियांग-गेकुचे आमदार कांगगोंग टाकू या सहा आमदारांचा समावेश आहे.

‘जदयु’ची आमदारांना नोटीस
पक्षाध्यक्ष नितीश कुमार यांनी सर्व सहा आमदारांना नोटीस बजावली आहे. भाजपनं जदयुला झटका दिल्याची ही पहिली वेळ नाही. यापूर्वी देखील भाजपनं जदयुला झटका दिला आहे. यापूर्वी 2019 पासून 2020 या एक वर्षाच्या काळात आधी बिहार आणि आता अरुणाचल प्रदेशात जदयुला धक्के दिले आहेत