दादरा-नगर हवेलीचे खासदार मोहन डेलकर यांची आत्महत्या
राजकारण

दादरा-नगर हवेलीचे खासदार मोहन डेलकर यांची आत्महत्या

मुंबई : मुंबईत मरिन ड्राईव्हमधील हॉटेलमध्ये दादरा आणि नगर हवेलीचे खासदार मोहन डेलकर यांनी आत्महत्या केल्याची बाब उघडकीस आली आहे. मोहन डेलकर याचं वय 58 वर्षांचं होतं. आत्महत्येच्या ठिकाणी गुजराती भाषेत लिहिलेली सुसाइड नोट सापडली आहे. ते दादरा आणि नगर हवेली लोकसभा क्षेत्रातील अपक्ष खासदार होते. याप्रकरणी तपास सुरु करण्यात आला असून घटना उघडकीस आल्यानंतर त्यांचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठविण्यात आला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

मोहन डेलकर यांचे मित्र भरत सिंह सोलंकी यांनी या घटनेसंदर्भात दुःख व्यक्त केलं. एबीपी न्यूजशी बोलताना त्यांनी सांगितलं की, “जेव्हा यासंदर्भात माहिती मिळाली तेव्हा मला धक्का बसला. आम्ही अनेक वर्षांपासून एकत्र काम करत होतो. ते मनमिळावू स्वभावाचे असून दादरा नगर हवेली क्षेत्राचा विकास हेच त्यांचं ध्येय होतं.”

कोण आहेत मोहन डेलकर ?
मोहन डेलकर यांनी तीन वेळा लोकसभा निवडणूक जिंकली होती. 2019 मध्ये त्यांनी काँग्रेसला रामराम ठोकत अपक्ष उमेदवार म्हणून लोकसभा निवडणूक लढवली होती. त्या निवडणूकीत ते निवडून आले होते. 1989 साली ते दादरा आणि नगर लोकसभा क्षेत्रातून ते खासदार म्हणून निवडून आले होते. आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात त्यांनी ट्रेड युनियन नेता म्हणून केली होती. ते काँग्रेस आणि भाजपच्या तिकिटावर निवडून आले होते. त्यानंतर त्यांनी भारतीय नवशक्ती पार्टी (बीएनपी) ची स्थापना केली होती.

गेल्या वर्षी बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्याशी झालेल्या बैठकीनंतर मोहन डेलकर यांनी दादरा आणि नगर हवेली येथील स्थानिक निवडणुकांसाठी जेडीयूशी करार केला होता. जेडीयूला पाठिंबा दर्शविल्यामुळे दादरा आणि नगर हवेलीमधील स्थानिक मतदानात भारतीय जनता पक्षाला जागा गमवावी लागली होती.