अर्थसंकल्पीय अधिवेशन: देवेंद्र फडणवीसांचे महाविकास आघाडीवर टीकास्त्र
राजकारण

अर्थसंकल्पीय अधिवेशन: देवेंद्र फडणवीसांचे महाविकास आघाडीवर टीकास्त्र

राज्यपालांच्या १२ पानांच्या भाषणात मला कुठेही यशोगाथा दिसत नाही, तर वेदना आणि व्यथा दिसतात, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. असे म्हणत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर टीकेचा बाण सोडला. राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला कालपासून सुरवात झाली. आज अधिवेशनाचा दुसऱ्या दिवशीही विरोधी पक्ष चांगलाच आक्रमक पाहायला मिळाला. यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी सत्ताधारी पक्षाला फैलावर घेतले.तर राज्यपालांच्या विमान प्रवासावरही त्यांनी टिकास्त्र सोडलं.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “आपल्या प्रोटोकॉलमध्ये राज्यपाल पहिल्या क्रमांकावर आहेत. मुख्यमंत्री आणि राज्यपाला यांच्यात कोणाला विमान द्यायचं अशी वेळ आली तर राज्यापलांना द्यायचं असतं. मात्र, राज्यपाल आणि आपल्यात मतभेद असतील पण मनाचा इतका कोटेपणा दाखवू नये. राज्यपाल व्यक्ती कोण आहे हे महत्वाचं नाही तर पद महत्वाचं असतं. राज्यपाल तिथे गेले, विमानात इंधन भरलेलं होतं. मग परवानगी नसताना इंधन कसं भरलं? परवानगी नसताना त्यांना बोर्डिंग पास कसा मिळाला? ते आतमध्ये जाऊन विमानात कसे बसले? असा सवालही त्यांनी यावेळी विचारला.

‘अशाप्रकारे रोज आपण ज्या राज्यपालांना अपमानित करता आज त्यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव आलाय याचं समाधान वाटतं. ज्यावेळी हे भाषण ऐकलं तेव्हा माझ्या मनात प्रश्न पडला. साहित्यात अनेक प्रकार असतात पण राज्यपालांचं भाषण कोणत्या श्रेणीत मोडतं याचा अभ्यास केला. तेव्हा लक्षात आलं १२ पानांच्या भाषणात कुठेही यशोगाथा दिसत नाही, वेदना आणि व्यथाच दिसतात. आपल्या अपयशाचा लेखोजोखा समोर येईल अशी भीती सरकारला वाटत आहे. जम्बो रुग्णालयाचा किती कंत्राटदारांना लाभ झाला, कोणाची घरं भरली गेली याचाही लेखाजोखा दिला असता तर अजून चांगलं वाटलं असतं,” असा टोला देवेंद्र फडणवीसांनी लगावला.

“सर्वात आधी माझं कुटुंब माझी जबाबदारी…आता मीच जबाबदार..म्हणजे सरकारची काहीच जबाबदारी नाही. सरकार हात झटकून मोकळं आहे. आपली पाठ थोपटण्यासाठी तयार आहे. बाकी सगळी जबाबदारी तुम्ही घ्या. मागच्या वेळी सुधीर मुनगंटीवार बोलले ना…सगळी जबाबदारी तुमची आणि उरलेली मोदींची. आमची काही जबाबदरीच नाही अशा प्रकारची अवस्था आपल्याला पहायला मिळत आहे. राज्यपालांचं भाषण म्हणजे पुढील एक वर्षात काय करणार आहोत, आमची दिशा काय आहे यासंदर्भात असलं पाहिजे. पण त्यात काहीच पहायला मिळत नाही. फक्त शब्दांचे रत्न लावून लोककल्याण साधता येत नाही,” अशी टीका फडणवीसांनी केली.

“देशात झालेल्या एकूण मृत्यूपैकी ३३ टक्के एकट्या महाराष्ट्रात आहे. कशाबद्दल पाठ थोपटून घेत आहात? डॉक्टरचा सल्ला घेतो की कम्पाऊंडरचा हा प्रश्न मला खरोखरच या सरकारला विचारावासा वाटतो. देशाच्या ४६ टक्के सक्रीय रुग्ण महाराष्ट्रात आहेत,” असं फडणवीस यावेळी म्हणाले. “यमक जुळवणारी भाषा यशाचं गमक असू शकत नाही हे मला राज्य सरकारला सांगायचं आहे,” असा टोला फडणवीसांनी यावेळी लगावला.

राज्याच्या वाढत्या कोरोना रुग्णसंख्येवर बोलताना ते म्हणाले की, ”कोरोनामुळे महाराष्ट्रात 52 हजार 184 मृत्यू महाराष्ट्रात झाले आहेत. कोरोनाच्या चाचण्या कमी केली गेली आहे. चाचण्यांची संख्या कमी केली गेली तरी संक्रमणाची परिस्थिती निर्माण झालीय, असं असताना सरकार स्वत:ची पाठ थोपटून घेतेय. अमरावतीमध्ये पुन्हा लॉकडाऊन कशाच्या आधारावर करण्यात आलं?, असा सवाल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला.