एकनाथ खडसेंवरील कारवाईनंतर फडणवीसांची पहिली प्रतिक्रीया
राजकारण

एकनाथ खडसेंवरील कारवाईनंतर फडणवीसांची पहिली प्रतिक्रीया

नाशिक : महाविकास आघाडीशी संबंधित नेते व मंत्र्यांच्या चौकशीवरून भारतीय जनता पक्षावर सध्या अनेक आरोप केले जात आहेत. माजी मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्या चौकशीवरून पुन्हा एकदा भाजप राज्यातील सत्ताधाऱ्यांच्या रडारवर आला आहे. भाजप राजकीय हेतूनं खडसेंना त्रास देत असल्याचा आरोप केला जात आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी हा आरोप स्पष्ट शब्दांत फेटाळून लावला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

नाशिकमध्ये एका कार्यक्रमांनंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी अनेक प्रश्नांना उत्तरं दिली. एकनाथ खडसे यांच्या ईडी चौकशीविषयी देखील त्यांना विचारण्यात आलं. त्यावर त्यांनी थेट काही बोलणं टाळलं. मात्र, भाजपवरील आरोप खोडून काढले. ‘खडसे यांच्या चौकशीच्या प्रकरणात मी काय बोलणार? जे काही सांगायचं आहे, ते ईडीकडून सांगितलं जाईल. मी काही ईडीचा प्रवक्ता नाही. पुरावे असतील म्हणून ईडी चौकशी करत असेल. कायदा आपलं काम करत असतो. भाजपमध्ये अशा प्रकारे सूड भावनेनं काम करण्याची कुठलीही प्रथा नाही,’ असं ते म्हणाले.

ईडीकडून चौकशी सुरू असलेले जवळपास सर्वच लोक प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष महाविकास आघाडीशी संबंधित आहेत. साहजिकच भाजपवर केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर केल्याचा आरोप होत आहे. खडसेंशी संबंधित एका प्रश्नाला उत्तर देताना फडणवीस यांनी आज हा आरोप अमान्य केला.