तुमची सर्वांची इच्छा असेल तर मी माघार घेते; तक्रारदार महिलेच्या ट्वीटने पुन्हा खळबळ
राजकारण

तुमची सर्वांची इच्छा असेल तर मी माघार घेते; तक्रारदार महिलेच्या ट्वीटने पुन्हा खळबळ

मुंबई : राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्यावरील बलात्काराच्या आरोपांमुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली आहे. मात्र यासर्व आरोप प्रत्यारोपांनंतर भाजपा आणि मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी आम्हालाही या महिलेने गळ घातल्याची तक्रार पोलिसांत केली आहे. याशिवाय जेट एअरवेजच्या एका माजी अधिकाऱ्याचाही यामध्ये समावेश आहे. या सर्व घटनाक्रमामुळे पीडितेच्या आरोपांना कलाटणी देणाऱ्या घडामोडी घडल्या आहेत. मात्र आता तक्रारदार रेणू शर्मा यांनीच आपण माघार घेत असल्याचं ट्विट आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

तुमची सर्वांची इच्छा असेल तर मी माघार घेते, असं ट्विट रेणू शर्मा यांनी केलं आहे. “एक काम करा तुम्ही सर्वांनीच मिळून निर्णय घ्या. कोणतीही माहिती नसताना जे मला ओळखतात तेदेखील चुकीचे आरोप करत असतील तर सर्वांनी मिळून निर्णय घ्या. ज्याप्रमाणे तुम्हा सर्वांची इच्छा आहे मी माघार घेते,” असं रेणू शर्मा यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

“जर मी चुकीची आहे तर हे लोक आतापर्यंत समोर का नाही आले? मी जरी मागे हटले तरी, कोणत्याही पक्षाचं नाव न घेताही मला खाली पाडण्यासाठी आणि आता हटवण्यासाठी इतक्या लोकांना एकत्र यावं लागलं आणि त्यांच्याविरोधात संपूर्ण महाराष्ट्रात मी एकटी मुलगी लढत होती याचा अभिमान आहे. आता तुम्हाला जे लिहायचं आहे ते लिहा,” असंही तिने आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

मुंडे यांच्यावरील आरोपांना नवी कलाटणी मिळाली असून भाजपा आणि मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी आम्हालाही या महिलेने गळ घातल्याची तक्रार पोलिसांत केली आहे. संबंधित महिलेने आपल्यालाही अडकवण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार भाजपाचे माजी आमदार कृष्णा हेगडे यांनी केली. हेगडे हे फडणवीस यांचे निकटवर्तीय मानले जातात. मनसेचे पदाधिकारी मनीष धुरी यांनीही आपल्याला या महिलेने दूरध्वनी केले असा आरोप केला आहे. या दोन राजकीय नेत्यांशिवाय जेट एअरवेजच्या एका माजी अधिकाऱ्याने महिलेबाबत अशीच तक्रार नोंदवली आहे.

तर, “कायद्यापेक्षा ना मंत्री मोठा आहे ना संत्री…महाराष्ट्रात कायदा कोणाच्याही बाबतीत भेदभाव करणार नाही. आमचं पोलीस खातं योग्यप्रकारे चौकशी करुन जो कोणी दोषी असेल त्याच्यावर योग्य प्रकारे कारवाई करेल”. अशी प्रतिक्रिया राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे. तसेच, ‘कायदेशीर कारवाई सुरु असून त्याप्रकारे कारवाई होईल. तपासात जे काही समोर येईल त्याप्रमाणे कारवाई केली जाईल,” असेही देशमुख यांनी यावेळी सांगितले.