धनंजय मुंडेंप्रकरणी गृहमंत्र्यांचे सूचक विधान; कायद्यापेक्षा ना मंत्री मोठा आहे ना संत्री…
राजकारण

धनंजय मुंडेंप्रकरणी गृहमंत्र्यांचे सूचक विधान; कायद्यापेक्षा ना मंत्री मोठा आहे ना संत्री…

मुंबई : “कायद्यापेक्षा ना मंत्री मोठा आहे ना संत्री…महाराष्ट्रात कायदा कोणाच्याही बाबतीत भेदभाव करणार नाही. आमचं पोलीस खातं योग्यप्रकारे चौकशी करुन जो कोणी दोषी असेल त्याच्यावर योग्य प्रकारे कारवाई करेल”. अशी प्रतिक्रिया राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे. तसेच, ‘कायदेशीर कारवाई सुरु असून त्याप्रकारे कारवाई होईल. तपासात जे काही समोर येईल त्याप्रमाणे कारवाई केली जाईल,” असेही देशमुख यांनी यावेळी सांगितले.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेणार नसल्याचा महत्त्वाचा निर्णय राष्ट्रवादीने घेतला आहे. धनंजय मुंडे यांच्यावर झालेल्या बलात्काराच्या आरोपानंतर राजकीय वर्तुळातून त्यांच्या राजीनाम्याची मागणी होताना दिसत आहे. हा मुद्दा ऐरणीवर आल्यानंतर गुरुवारी रात्री उशिरा राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्या निवासस्थानी राष्ट्रवादीच्या कोअर कमिटीच्या बैठकित हा निर्णय घेण्यात आला. यामध्ये धनंजय मुंडे यांच्यावर झालेले बलात्काराचे आरोप व त्यांचा राजीनामायच्या मुद्द्यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचे आरोप झाल्यानंतर आता यामध्ये मोठी कलाटणी मिळाली आहे. संबंधित महिलेविरोधात अनेकांनी ब्लॅकमेल करत असल्याचे आरोप केले आहेत.

मुंडे यांच्यावर आरोपानंतर भाजपा आणि मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी आम्हालाही या महिलेने गळ घातल्याची तक्रार पोलिसांत केली आहे. संबंधित महिलेने आपल्यालाही अडकवण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार भाजपाचे माजी आमदार कृष्णा हेगडे यांनी केली. हेगडे हे फडणवीस यांचे निकटवर्तीय मानले जातात. मनसेचे पदाधिकारी मनीष धुरी यांनीही आपल्याला या महिलेने दूरध्वनी केले असा आरोप केला आहे. या दोन राजकीय नेत्यांशिवाय जेट एअरवेजच्या एका माजी अधिकाऱ्याने महिलेबाबत अशीच तक्रार नोंदवली आहे. या सर्व घटनाक्रमामुळे आता या प्रकरणाला वेगळेच वळण लागले आहे. त्यामुळे या प्रकरणात पुढे काय होते, हे पाहणे अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे.