भाजपविरोधात शरद पवारांचा मास्टरप्लॅन
राजकारण

भाजपविरोधात शरद पवारांचा मास्टरप्लॅन

नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी देशभरात भाजपविरोधी पक्षांची मोट बांधण्यास सुरुवात केली आहे. २०२४च्या लोकसभा निवडणुकांपूर्वी शरद पवार विरोधकांना एकत्र आणण्याची रणनिती आखत असल्याचं वृत्त आहे. निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर यांच्याशी चर्चा केल्यानंतर मंगळवारी दुपारी ४ वाजता बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

कोरोना काळात पहिल्यांदाच विरोधक व्हिडिओ कॉन्फरन्सऐवजी एकत्र बैठकीला उपस्थित राहणार आहेत. राष्ट्रमंचच्या माध्यमातून १५ पक्षांचे प्रमुख या बैठकीला उपस्थित राहण्याची शक्यता आहे. राष्ट्रीय जनता दल नेते तेजस्वी यादव यांनाही या बैठकीचं आमंत्रण देण्यात आलं आहे. मात्र या बैठकीचं काँग्रेसला बोलवणं नसल्याची माहिती मिळाली आहे.

राष्ट्र मंचच्या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार पहिल्यांदाच भाग घेणार आहेत. राष्ट्रमंचची पायाभरणी २०१८ साली यशवंत सिन्हा यांनी केली होती. सध्या तरी कोणत्याच राजकीय वाटलीची घोषणा राष्ट्रमंचाकडून करण्यात आलेली नाही. मात्र भविष्यात तिसरी आघाडी स्थापन करण्याची शक्यता राजकीय जाणकारांनी व्यक्त केली आहे. त्याचबरोबर ममता बॅनर्जी यांना तिसऱ्या आघाडीचा चेहरा बनवण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याचं बोललं जात आहे. तसेच शरद पवार तिसऱ्या आघाडीच्या संयोजकपदाची भूमिका पार पाडतील असंही सांगण्यात येत आहे.