पोहरा देवीच्या दर्शनासाठी गेलेल्या संजय राठोडांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी; कोरोना संकटाचा समर्थकांना विसर
राजकारण

पोहरा देवीच्या दर्शनासाठी गेलेल्या संजय राठोडांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी; कोरोना संकटाचा समर्थकांना विसर

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणामुळे चर्चेत आल्यानंतर गेल्या दोन आठवड्यांपासून नॉट रिचेबल असलेले राज्याचे वनमंत्री संजय राठोड अखेर समोर आले आहेत. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात संजय राठोड यांच्यावर आरोप झाल्यानंतर ते कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी दिसले नाहीत. मात्र त्यातच १५ दिवसांनी संजय राठोड हे सर्वांसमोर आले असून पोहरादेवीला दाखल झाले आहेत. संजय राठोड आज सकाळी पोहरादेवीच्या दर्शनाला रवाना झाले. शासकीय वाहनांऐवजी स्वतःची लॅन्ड क्रूझर या खासगी गाडीतून त्यांनी प्रवासाला सुरवात केली, यावेळी त्यांच्यासोबत पत्नी शीतल राठोड आणि कुटुंबातील इतर सदस्यही होते.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

पण, शक्तीप्रदर्शन करण्याच्या नादात राज्यावर आलेल्या कोरोना संकटाचा त्यांच्या समर्थकांना विसर पडल्याचंच दिसलं. इतकंच नव्हे तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या आवाहनालाही संजय राठोड आणि समर्थकांनी हरताळ फासल्याचं पोहरादेवी परिसरातील प्रचंड गर्दीतून स्पष्ट झालं. विशेष म्हणजे यावेळी त्यांच्या समर्थकांकडून शक्तीप्रदर्शन करताना “कोण आला रे कोण आला…बंजाऱ्यांचा वाघ आला” अशा घोषणाही दिल्या जात आहेत.

दरम्यान राज्यात करोना रुग्ण वाढत असल्याने एकीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी आणली असताना दुसरीकडे संजय राठोड यांच्या समर्थकांनी तुफान गर्दी केली आहे. गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीचार्जदेखील करावा लागला. मात्र गर्दी कमी होत नसून यावेळी संजय राठोड यांना पाठिंबा दाखवण्यासाठी घोषणा दिल्या जात आहेत.

पूजा चव्हाण प्रकरण चर्चेत आल्यापासून संजय राठोड नॉट रिचेबल होते. एका ऑडिओ क्लिपमुळे संजय राठोड यांचं नाव चर्चेत आलं होतं. यानंतर भाजपाने जाहीरपणे संजय राठोड यांच्याविरोधात कारवाईची मागणी सुरु केली होती. त्यानंतर पहिल्यांदाच संजय राठोड सर्वांसमोर आले असून पोहरादेवीत दाखल झाले आहेत. संजय राठोड येणार असल्यानेच पोहरादेवीत सकाळपासूनच जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात येत होतं. संजय राठोड समर्थकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली असून पोलिसांचाही मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. संजय राठोड कुटुंबीयांसह पोहरादेवीसाठी रवाना झाले होते. ते बंजारा समाजाला उद्धेशून भाषण करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे इतके दिवस मौन बाळगणारे संजय राठोड आपली बाजू मांडताना नेमकं काय बोलणार याची उत्सुकता आहे.

दरम्यान एकीकडे विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी कुणाचं नाव न घेता चौकशीची मागणी करणारं पत्र पोलीस महासंचालकांना दिलं असताना या प्रकरणात वनमंत्री संजय राठोड यांच्यावर गुन्हा दाखल करा, अशी थेट मागणी भाजपच्या प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी केली आहे. “पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात समाजमाध्यमांमध्ये ध्वनिफितीसुद्धा फिरत आहेत. त्यामुळे बंजारा समाजात प्रचंड अस्वस्थता असून याप्रकरणी सखोल चौकशी करावी,” अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस महासंचालकांकडे पत्र पाठवून केली होती.