संजय राठोडांवर तत्काळ गुन्हा दाखल करावा; प्रवीण दरेकरांची मागणी
राजकारण

संजय राठोडांवर तत्काळ गुन्हा दाखल करावा; प्रवीण दरेकरांची मागणी

वाशिम : एकीकडे मुख्यमंत्री मास्क घाला, असं अवाहन करतात तर दुसरीकडे शेकडो समर्थकांच्या उपस्थितीत संजय राठोड गर्दी करत आहेत हे गंभीर आहे. उद्धव ठाकरे यांनी याप्रकरणी तात्काळ गुन्हा दाखल करावा आणि ठाकरी बाणा दाखवावा, अशी मागणी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणामुळे चर्चेत आल्यानंतर गेल्या दोन आठवड्यांपासून नॉट रिचेबल असलेले राज्याचे वनमंत्री संजय राठोड अखेर समोर आले आहेत. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात संजय राठोड यांच्यावर आरोप झाल्यानंतर ते कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी दिसले नाहीत. मात्र त्यातच १५ दिवसांनी संजय राठोड हे सर्वांसमोर आले असून पोहरादेवीला दाखल झाले आहेत. संजय राठोड आज सकाळी पोहरादेवीच्या दर्शनाला रवाना झाले. यावेळी संजय राठोड यांच्या स्वागतासाठी त्यांच्या कार्यकर्त्यांनी याठिकाणी मोठी गर्दी केली होती.

ही गर्दी पाहता राज्यात कोरोनाचं संकट वाढत असताना गर्दी टाळावी, कोरोना संसर्ग वाढणार नाही याची योग्य खबरदारी घ्यावी, असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं होतं. मात्र त्यांच्याच मंत्रिमंडळातील मंत्र्याने मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला केराची टोपली दाखवली आहे. पोहरादेवी येथे झालेल्या गर्दीत कोरोनाच्या नियमांचं पालन करण्यात आलं नाही.

संजय राठोड यांच्या स्वागतासाठी पोहरोदेवी येथे जमलेल्या गर्दीला पांगवण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीचार्जही करावा लागला. या गर्दीमुळे कोरोनाचा धोका वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. वाशिम आणि यवतमाळमध्येही कोरोनाची रुग्ण झपाट्याने वाढताना दिसत आहेत. संजय राठोड यांच्या समर्थकांनी केलेल्या गर्दीमुळे कोरोनाचा संसर्ग वाढल्यास त्याला जबाबदार कोण? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या सर्वांवर कारवाई करणार का? असे अनेक प्रश्न आता उपस्थित केले जात आहेत.