राऊत-फडणवीसांची गळाभेट; चंद्रकांत पाटील म्हणाले, आपल्या देशाची एक संस्कृती आहे की…
राजकारण

राऊत-फडणवीसांची गळाभेट; चंद्रकांत पाटील म्हणाले, आपल्या देशाची एक संस्कृती आहे की…

मुंबई : “आपल्या देशाची एक संस्कृती अशी आहे की दुश्मन जरी असला तरी तो दुश्मन नावाच्या आणि कामाच्या जागी असतो. एरवी आपण एकमेकांना खूप प्रेम देतो. संजय राऊत यांच्या मुलीच्या साखरपुड्याच्या कार्यक्रमाला देवेंद्र फडणवीस गेले हे चांगलंच आहे. त्यांनी जायला पाहिजेच होतं. स्वाभाविकपणे दोन मित्र भेटल्यानंतर त्यांचे दोन राजकीय विचार वेगळे असू शकतात पण गळाभेट ही प्रेमाची होती. असे म्हणत भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आपली भूमिका मांडली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या मुलीचा पूर्वशीचा ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांचा मुलगा मल्हार यांच्याशी रविवारी साखरपुडा झाला. संजय राऊत यांच्या मुलीच्या साखरपुडा समारंभात राजकीय वर्तुळातील अनेक लोक हजर होते. या कार्यक्रमातील एका फोटोने राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागल्या आहेत. तो फोटो म्हणजे संजय राऊत आणि देवेंद्र फडणवीस यांच्या गळा भेटीचा. त्या गळाभेटीवर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, राजकारणात दुश्मनी कधीच नसते. उलट मैत्री असायला पाहिजे. शरद पवार यांच्यावर आम्ही टीका करतो. आम्हाला पाश्चिम महाराष्ट्रात जर काम वाढवायचे असेल, तर त्यांच्यावर टीका केल्याशिवाय आम्ही वाढूच शकत नाही. पण मी भेटल्यावर मात्र त्यांना वाकून नमस्कार करणारच, कारण ही आमची संस्कृती आहे”, असे पाटील म्हणाले.

त्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्रीय कृषी कायद्याबाबत केलेल्या ट्वीट बाबत त्यांना विचारले असता चंद्रकांत पाटील म्हणाले की, “शेतकऱ्यांशी संवाद साधण्याचे प्रयत्न केंद्र सरकारने केले आहेत. याच्यापेक्षा केंद्र सरकारने आणखी काय करायला पाहिजे हे मलाही समजत नाही. महत्त्वाची बाब म्हणजे ज्या दिवशी लोकसभा आणि राज्यसभेत हे कायदे पास झाले, त्यावेळी या कायद्याबाबत चर्चा झाली पाहिजे असं जर शरद पवार यांना वाटत होतं, तर त्या दिवशी त्यांनी राज्यसभेत हजर राहणं आवश्यक होतं. खरं तर आता शेतकऱ्यांना घरी जाण्याचा सल्ला शरद पवार यांनी दिला पाहिजे”, असं मत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले.