वाढत्या दबावानंतर अखेर संजय राठोडांचा राजीनामा
राजकारण

वाढत्या दबावानंतर अखेर संजय राठोडांचा राजीनामा

मुंबई : पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात वाढत्या दबावानंतर वनमंत्री संजय राठोड यांनी अखेर राजीनामा दिला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वर्षा निवासस्थानी भेट घेत संजय राठोड यांनी कॅबिनेट मंत्रिपदाचा राजीनामा सुपूर्द केला. संजय राठोड पत्नी शीतल आणि मेहुणे सचिन नाईक यांच्यासह मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर गेले होते. त्यानंतर वर्षा बंगल्यावरील घडामोडींकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं होतं.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

संजय राठोड पत्नी शीतल आणि मेहुणे सचिन नाईक यांच्यासह वर्षा बंगल्यावर गेले. राजीनामा देतो पण या प्रकरणाची चौकशी झाल्यानंतर त्याचा स्वीकार करावा अशी काहीशी भूमिका संजय राठोड यांनी घेतली होती. आपले मंत्रिपद टिकावं म्हणून संजय राठोड शेवटपर्यंत प्रयत्न करत होते.त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मंत्री एकनाथ शिंदे यांची स्वतंत्र दालनात चर्चा झाली. संजय राठोड यांचा राजीनामा घेण्यास एकनाथ शिंदे यांनी विरोध केला. राठोड यांनी पोहरादेवीच्या महंतांशी बोलण्याची विनंती केली, परंतु मुख्यमंत्र्यांनी चर्चेला नकार दिला. मला माझा निर्णय घ्यावा लागेल, अशी भूमिका उद्धव ठाकरेंनी घेतली.

दरम्यान, संजय राठोड यांचा राजीनामा घेतला नाही तर अधिवेशन चालू देणार नसल्याचा इशारा भारतीय जनता पक्षाने घेतला होता. तसेच संजय राठोड यांनी राजीनामा द्यावा यासाठी शनिवारी राज्यभरात आंदोलन करण्यात आलं होतं. त्यानंतर शनिवारी सकाळी संजय राऊत यांनी सूचक विधान केलं होतं. संजय राऊत यांनी ट्वीटमध्ये म्हटलं होतं की, “छत्रपती शिवाजी महाराजांच्या हातातला राजदंड काय सांगतो? महाराष्ट्र धर्म म्हणजे राजधर्माचे पालन!” या ट्वीटमधून जणू त्यांनी संजय राठोडांना राजीनामा द्यावा लागणार याचे संकेत दिले होते.

त्याचबरोबर संजय राठोड यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला तर विदर्भात शिवसेनेला मोठे नुकसान होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. याचे कारण म्हणजे , ज्या बंजारा समाजाचं नेतृत्व संजय राठोड करत आहेत त्या बंजारा समाजाची संख्या जवळपास 2 कोटीच्या आसपास आहे. संजय राठोडांच्या राजीनाम्यानंतर शिवसेनेला या बंजारा समाजाचा रोष पत्करावा लागेल. तर दुसरीकडे पोहरादेवी गडाच्या महंतांनीही संजय राठोड यांचा राजीनामा घेऊ नये अशी भूमिका मांडली आहे. संजय राठोड यांचा राजीनामा घेतला गेल्यास फक्त राठोड नाही तर संपूर्ण बंजारा समाज दोषी ठरला जाईल. त्यांचा राजीनामा घेतल्यानंतर राज्यात होणाऱ्या उद्रेकाला भारतीय जनता पार्टी जबाबदार राहील, अशी आक्रमक भूमिका महंत सुनील महाराज यांनी मांडली आहे. अशावेळी बंजारा समाजाची नाराजी ओढावून घेणं शिवसेनेला परवडणारं नाही.