ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लावाल तर याद राखा; फडणविसांचा ठाकरे सरकारला इशारा
राजकारण

ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लावाल तर याद राखा; फडणविसांचा ठाकरे सरकारला इशारा

मुंबई :  मराठा समाजाला आरक्षण मिळायला हवं याबाबत काही शंकाच नाही पण ओबीसीच्या आरक्षणात आम्ही कोणताही वाटेकरी स्वीकारणार नाही, अशी ठाम भूमिका विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आहे. तसेच, ओबीसी आरक्षणाबाबत काँग्रेस आणि राष्ट्रवादीने त्यांची अधिकृत भूमिका स्पष्ट करावी, असं आव्हानही त्यांनी दिलं. भाजपच्या ओबीसी कार्यकारणीची बैठकीत ते बोलत होते.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

यावेळी बोलताना फडणवीस म्हणाले की, ”मराठा समाजाला आरक्षण देताना त्यात ओबीसी आरक्षणाला धक्का लावणार नाही, असं कलम त्यात टाकलं आहे. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिली आहे. पण या कलमाला कोणतीही स्थगिती दिली नाही. या कलमाद्वारे आम्ही ओबीसी आरक्षणाला संरक्षण दिलं आहे. शिवाय, ओबीसी आरक्षणात कोणताही वाटेकरी स्वीकारणार नसून ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लावाल तर याद राखा, असा इशाराच त्यांनी दिला आहे.

तसेच, ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही. या आरक्षणात कुणालाही वाटेकरी केलं जाणार नाही, हे स्पष्ट करणारा अध्यादेश राज्य सरकारने काढावा, अशी मागणी त्यांनी यावेळी केली. त्याचबरोबर, मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण मिळालं पाहिजे. ओबीसी आरक्षणात कोणीही वाटेकरी नको. ही भाजपची अधिकृत भूमिका स्पष्ट केली. आता काँग्रेस आणि राष्ट्रवादीनेही ओबीसी आरक्षणाबाबतची त्यांची भूमिका स्पष्ट करावी, असं आव्हानच त्यांनी यावेळी दिलं.

यावेळी फडणवीस यांनी ठाकरे सरकारमधील ओबीसी मंत्र्यांवरही टीका केली. ओबीसींना आरक्षण देण्याची मागणी करत ओबीसी मंत्री बाहेर आंदोलन करत आहेत. मात्र, मंत्रिमंडळाच्या बैठकीत गप्प बसतात. असा टोलाही फडणवीस यांनी लगावला आहे. तसंच, येत्या काळात ३४६ ओबीसी घटकांचा मेळावा घेणार असल्याची घोषणाही त्यांनी केली आहे.

भाजपमध्ये ओबीसींचं योगदान मोठं आहे. त्यामुळे भाजपला ओबीसींचा पक्ष म्हटलं जायचं असं सांगतानाच ‘सबका साथ सबका विकास’ हेच भाजपचं ध्येय आहे. त्यामुळे ओबीसींचा विकास होणार नाही, तोपर्यंत राज्याचा विकास होणार नाही. त्यामुळे ओबीसींची विकास झाला पाहिजे. येत्या काळात 346 ओबीसी घटकांचा मेळावा घेतला जाईल. असेही त्यांनी यावेळी नमूद केले.