राजीनामा मागणाऱ्या विरोधकांना संजय राऊतांनी फटकारले; म्हणाले…
राजकारण

राजीनामा मागणाऱ्या विरोधकांना संजय राऊतांनी फटकारले; म्हणाले…

मुंबई : “विरोधी पक्ष आरोप करत असतो. त्यांना कितीही आरोप करु देत…तरी एक लक्षात घेतलं पाहिजे की हे सरकार भक्कम आहे. अशा आरोपांमुळे सरकारचा एकही खिळा ढिला पडणार नाही,” असा विश्वास शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे. राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर झालेल्या बलात्काराच्या आरोपांमुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली असताना संजय राऊत यांनी विरोधांना फटकारले आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

विरोधक मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत, असे विचारले असता ते म्हणाले की, “राजीनामा घेतला पाहिजे हा विरोधी पक्षाचा एक ज्वलंत मंत्र असतो. काही झालं तरी राजीनामा घ्या असं ते म्हणतात. असं जर म्हणायला गेलो तर आम्ही रोज पंतप्रधानांचा राजीनामा मागू. दिल्लीत जे आंदोलन सुरु आहे ते राजीनामा मागण्यासारखंच आहे”. “प्रत्येक आरोपाला उत्तर दिलं पाहिजे असं काही घटनेत लिहिलेलं नाही. महाविकास आघाडीला काही धक्का बसणार नाही. आरोप करु देत त्याच्याने काही होत नाही,” असंही संजय राऊत यांनी म्हटलं.

दरम्यान, दुसरीकडे महाविकास आघाडीवर टीका करताना विरोधक धनंजय मुंडे आणि नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. सोबतच उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यावरही टीका केली जात आहे. मात्र संजय राऊत यांनी आरोप करणाऱ्यांना सणसणीत उत्तर देत विरोधकांना सुनावलं आहे. तर विशेष म्हणजे राष्ट्रवादीच्या कोअर कमिटीच्या बैठकीत देखील धनंजय मुंडेंचा राजीनामा घेणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.