आ देखे जरा किस मे कितना है दम; पत्नीला आलेल्या नोटीसीवर संजय राऊतांचे भाजपाला आव्हान
राजकारण

आ देखे जरा किस मे कितना है दम; पत्नीला आलेल्या नोटीसीवर संजय राऊतांचे भाजपाला आव्हान

मुंबई : ”मी ईडीच्या नोटिशीबद्दल काहीच सांगत नाही. भाजपचे नेतेच ईडीची नोटीस आल्याचं सांगत आहेत. त्यांच्याकडे जास्त माहिती आहे. त्यामुळे मी माझा माणूस भाजपच्या कार्यालयात पाठवला आहे. ईडीची नोटीस कदाचित तिथे अडकली असेल,’ असा टोला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी लगावला. पीएमसी बँक घोटाळ्याप्रकरणी संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीने नोटीस धाडली आहे. या नोटीसनुसार 29 तारखेला वर्षा राऊत यांना चौकशीसाठी ईडीसमोर हजर राहण्याचे आदेश देण्यात आला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

याबाबत बोलताना संजय राऊत यांनी भारतीय जनता पक्षावर थेट निशाणा साधला आहे. हे पूर्णपणे राजकारण सुरू असल्याच संजय राऊत यांनी म्हंटल आहे. तसेच, राऊत यांनी ‘आ देखे जरा किस मे कितना है दम, जमके रखना कदम मेरे साथिया,’ अशा एका हिंदी चित्रपटातील गाण्याच्या ओळींचे ट्विट करत एक प्रकारे आव्हान स्वीकारल्याचा इशारा दिला आहे.

तर या प्रकरणी महाविकास आघाडीतील नेत्यांनी केंद्र सरकारकडून सुडाचं राजकारण करत असल्याचा आरोप केला आहे. शिवसेना नेते आमदार प्रताप सरनाईक, माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्यानंतर आता ईडीने राऊत यांच्याकडे मोर्चा वळवल्याने त्याचे राजकीय पडसाद उमटू लागले आहेत.

गेल्या वर्षी विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाविकास आघाडीचं सरकार स्थापन करण्यात संजय राऊतांनी मोठी भूमिका बजावली होती. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याप्सून कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या भेटीगाठीपर्यंत संजय राऊत यांनी पुढाकार घेतला होता. महाविकास आघाडीच्या स्थापन झाल्यानंतर गेले वर्षभर ते सातत्याने भाजप, पंतप्रधान मोदींवर टीकेची झोड उठवत आहेत. त्या पार्श्वभूमीवर त्यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीने समन्स बजावल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. विरोधकांनी त्याबाबत टीकेची झोड उठवली आहे.

तर, काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनीदेखील भाजपावर निशाणा साधला आहे. ”ईडी, सीबीआय अशा संस्थांनी आपली कार्यालये आता भाजप कार्यालयातच हलवावीत. केवळ भाजपचे विरोधक आहेत, म्हणून जुने प्रकरण उकरून काढून त्यांना त्रास दिला जात आहे. जनतेलाही आता हे समजले आहे,” अशी टीका सावंत यांनी केली आहे.