सुप्रिया सुळे मुख्यमंत्री होण्यावर शरद पवारांचे पहिल्यांदाच स्पष्टीकरण
राजकारण

सुप्रिया सुळे मुख्यमंत्री होण्यावर शरद पवारांचे पहिल्यांदाच स्पष्टीकरण

मुंबई : राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री होण्यावर पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी पहिल्यांदाच स्पष्टीकरण दिले आहे. भाजप नेते आशिष शेलार यांनी शरद पवार यांच्या समोरच मराठा स्त्री राज्याची मुख्यमंत्री व्हावी, असं विधान केलं होतं. त्यानंतर राजकीय वर्तुळात सुप्रिया सुळे यांच्या मुख्यमंत्रीपदाबाबतच चर्चा सुरू झाली होती. त्यानंतर पवार यांनी सुळे यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या चर्चेबाबत बोलताना सुळेंना राज्यातील राजकारणास रस नसून त्यांना केंद्रातील राजकारणात रस असल्याचं स्पष्ट केलं आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

शरद पवार यांनी सुप्रिया सुळे यांच्या नावाची मुख्यमत्रीपदाबाबतची चर्चा फेटाळून लावली. सुप्रिया सुळे यांना राज्यातील राजकारणात रस नसून त्यांना राष्ट्रीय राजकारणात रस आहे. सुप्रिया सुळे यांना देशपातळीवर अनेक पुरस्कार प्राप्त झालं आहेत. त्यांना देशपातळीवरच काम करण्याची आवड आहे. प्रत्येकाची एक आवड असते. त्यांची आवड देशपातळीवरील कामात आहे, असं शरद पवार म्हणाले होते. एका दैनिकाला दिलेल्या विशेष मुलाखतीत त्यांनी या विषयावर भाष्य केलं आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सर्वांचा संच मोठा आहे. या सर्वांतून मान्य असतील अशा अनेक लोकांची नावं घेता येतील. अजित पवार आहेत, जयंत पाटील, धनंजय मुंडे अशी अनेक नावं देता येतील जी नेतृत्व करण्यास सक्षम आहेत, असंही ते नेतृत्वाबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना म्हणाले.