डॉ.आंबेडकरांच्या घटनेनुसार कारभार होणार आहे का? हे सांगणारा हा निकाल असेल – उद्धव ठाकरे
राजकारण

डॉ.आंबेडकरांच्या घटनेनुसार कारभार होणार आहे का? हे सांगणारा हा निकाल असेल – उद्धव ठाकरे

मुंबई, 8 जुलै : राज्यातील सत्तासंघर्षात शिवसेना पक्ष केंद्रस्थानी आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वाखाली बहुसंख्य आमदारांनी उद्धव ठाकरेयांच्या विरोधात बंड केले. भाजपाच्या पाठिंब्यानं शिंदे मुख्यमंत्री झाले आहेत. त्यांच्या नियुक्तीला शिवसेनेकडून सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. शिवसेनेतील बहुसंख्य आमदार गमावल्यानंतर पक्षाचं निवडणूक चिन्ह असलेलं धनुष्यबाण चिन्ह देखील ठाकरे गट गमावण्याची शक्यता आहे. ‘शिवसेनेच्या चिन्हाबद्दल चर्चा सुरू आहे. आज माध्यमांशी बोलताना उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) आपली भूमिका मांडली आहे

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

कायद्यानुसार धनुष्यबाण शिवसेनेपासून कोणीही हिरावून घेऊ शकत नाही असा इशारा ठाकरे यांनी शिंदे गटाला दिला आहे. सगळे आमदार गेले, तरी पक्ष अस्तित्वात असतो. तुम्ही भ्रमाच्या भोपळ्यात अडकू नका. जे 15-16 आमदार माझ्याबरोबर राहिलेत त्यांचं जाहीर कौतुक करायचंय.

अशी जिगरीची माणसं असतात, तिथे विजय होतोच. माझा न्यायदेवतेवर विश्वास आहे. येत्या 12 तारखेला सुनावणीचा निकाल येईल तो शिवसेनेच्या भविष्याचा निकाल नसेल. पण या केसमुळे देशात लोकशाहीचं भविष्य किती काळ मजबूत राहणार आहे.

आंबेडकरांच्या घटनेनुसार कारभार होणार आहे का हे सांगणारा हा निकाल असेल. देशाच्या लोकशाहीची वाटचालीची दिशा दाखवणारा निकाल ठरेल.’ असे ठाकरे यांनी यावेळी स्पष्ट केले. ‘आजपर्यंत गप्प असणारे तिकडे जाऊन बोलतायत. या लोकांना आजही उद्धव ठाकरेंबद्दल प्रेम आहे, आदित्यबद्दल आणि मातोश्रीबद्दल प्रेम आहे.

खरंच धन्य झालो.ज्यांनी टीका केली त्यांच्या मांडीला मांडी लावून बसत आहात. मग तुमचं हे प्रेम खरं आहे की खोटं हे जनतेला कळू द्या. शिवरायाचा महाराष्ट्र आहे. डोळे नसलेल्या धृतराष्ट्राचं राज्य नाही,’ असेही ठाकरे यांनी शिंदे गटाला खडसावलं.