राष्ट्रीय स्तरावर भाजपविरोधात मोर्चेबांधणी? आदित्य ठाकरे घेणार तेजस्वी यादवांची भेट
राजकारण

राष्ट्रीय स्तरावर भाजपविरोधात मोर्चेबांधणी? आदित्य ठाकरे घेणार तेजस्वी यादवांची भेट

मुंबई : भाजप आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या दोन राजकीय पक्षांतील वाढलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर दोन्ही बाजूचे नेते एकमेकांवर जोरदार हल्लाबोल करत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर ठाकरे कुटुंबाच्या राजकीय भवितव्याविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. त्यामुळे शिंदे यांच्या बंडाला ज्यांनी साथ दिली त्या भाजपविरोधात मोर्चेबांधणी करण्यासाठी शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि आमदार आदित्य ठाकरे हे सज्ज झाले असून उद्या ते एकदिवसीय बिहार दौऱ्यावर जाणार आहेत.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

आदित्य ठाकरे हे बुधवार दिनांक २३ नोव्हेंबर २०२२ रोजी एक दिवसीय बिहार दौऱ्यावर जातील. बिहारची राजधानी पाटणा येथे ते राष्ट्रीय जनता दलाचे नेते आणि बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांची सदिच्छा भेट घेणार आहेत. या दौऱ्यात शिवसेना सचिव आणि खासदार अनिल देसाई तसंच शिवसेना उपनेत्या खासदार प्रियंका चतुर्वेदी आणि इतर काही प्रमुख पदाधिकारीही आदित्य ठाकरे यांच्यासोबत उपस्थित असणार आहेत.

राष्ट्रीय राजकारणात भाजपविरोधात मोर्चेबांधणी?

भाजपकडून केंद्रीय सत्तेचा वापर करून इतर राजकीय पक्षांना संपवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप देशभरातील विविध विरोधी पक्षांकडून वारंवार केला जात असतो. त्यामुळे भाजपला केंद्रातील सत्तेतून खाली खेचण्यासाठी विरोधी पक्षांच्या एकजुटीचा मुद्दा वारंवार अधोरेखित करण्यात येतो. या अनुषंगाने याआधीही अनेकदा प्रयत्न केले गेले आहेत. २०२४ मध्ये होणाऱ्या आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता पुन्हा एकदा देशव्यापी आघाडीसाठी प्रयत्न सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे आणि तेजस्वी यादव यांच्यात होणाऱ्या भेटीला महत्व प्राप्त झालं आहे.

आदित्य ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेतही हजेरी लावली होती. देशातील हुकूमशाही राजवटीविरोधात लोकशाही वाचवण्यासाठी एकत्र येण्याची गरज असल्याची भूमिका तेव्हा आदित्य यांनी मांडली होती. आता ते बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांचीही भेट घेणार असल्याने भविष्यात राष्ट्रीय पातळीवर विरोधकांची एकजूट दिसणार का, अशी चर्चा आता सुरू झाला आहे.