नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या गाडीचा अपघात; वाचा, नक्की काय झाले
राजकारण

नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या गाडीचा अपघात; वाचा, नक्की काय झाले

ठाणे : राज्याचे नगरविकास मंत्री आणि ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गाडीचा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातात एकनाथ शिंदे यांच्या अंगठ्याला थोडीफार दुखापत वगळता शिंदे यांच्या प्रकृती उत्तम आहे. गुरुवारी 24 डिसेंबरला वाशी टोल नाक्यावर मुंबईच्या दिशेने जाताना गाडीला अपघात झाल्याचं सांगण्यात येत आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

मिळालेल्या माहितीनुसार, एकनाथ शिंदे आपल्या टोयटा एसयूव्ही गाडीने गुरुवारी मुंबईला चालले होते. वाशी टोलनाका ओलांडल्यानंतर शिंदे यांच्या कारला अपघाताला सामोरे जावे लागले. या अपघातात सुदैवाने शिंदे यांना कोणतीही गंभीर इजा झाली नाही. शिंदे यांच्या हाताला किरकोळ मार लागला असून अंगठ्यालाही दुखापत झाली आहे. अपघातात गाडीच्या पुढच्या भागाचे काही प्रमाणात नुकसान झाले आहे. अपघाताबाबत अधिक तपशील मिळू शकला नाही.

दरम्यान,एकनाथ शिंदे यांच्या विरोधात जव्हारमध्ये जादूटोणा केला जात असल्याचं काही दिवसांपूर्वी उघड झालं होतं. विक्रमगड तालुक्यातील जव्हार पोलीस स्टेशन हद्दीतील कऱ्हे तलावली येथील एका घरात तांदळामध्ये पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोटो ठेवून त्यांच्या फोटोला मांत्रिक पूजा घालताना तसंच धूप, अगरबत्ती, गुलालही व्हिडीओत पाहायला मिळाले होते. आतापर्यंत दोघांना अटकही करण्यात आली आहे. पण हे एखादं मोठं षडयंत्र आहे का याचा तपासही आता पोलीस करत आहेत.

तसेच, अघोरी पूजा करणाऱ्यांकडून एकनाथ शिंदे यांच्या फोटोसमोर अगरबत्ती लावून हळद, कुंकू, काळा बुक्का, लिंबू, सफेद कोंबडा यांचा वापर करुन अघोरी जादूटोणा करण्यात येत होता. याप्रकरणी पालघर उपविभागीय पोलीस अधिकारी विकास नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली बोईसर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने विक्रमगड तालुक्यातील आणि जव्हार पोलीस स्टेशन हद्दीतील कऱ्हे तलावली येथून दोघांना रंगेहाथ अटक केली होती.