मी तुरुंगात गेलेला माणूस आहे, हक्कभंगाला घाबरतो की काय…संजय राऊतांनी एका वाक्यात हवा काढली!
राजकारण

मी तुरुंगात गेलेला माणूस आहे, हक्कभंगाला घाबरतो की काय…संजय राऊतांनी एका वाक्यात हवा काढली!

मुंबई : आज विधिमंडळात माझ्याविरोधात गदारोळ झाला, असं मला कळलं. मुळात माझ्या भावना समजून घेतल्या पाहिजेत. मी कोणत्या संदर्भाने बोललो याचा सारासार विचार करायला हवा. माझ्यावर हक्कभंग आणण्याचा पूर्ण अधिकार सदस्यांना असू शकतो. जर सभागृहाने माझ्याविरोधात हक्कभंग आणला तर मी त्याला निर्भीडपणे सामोरे जाईन. मी तुरुंगात गेलेला माणूस आहे, हक्कभंगाला घाबरतो की काय… अशा शब्दात ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी सत्ताधाऱ्यांना ललकारलं.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी विधिमंडळाचा उल्लेख चोरमंडळ, असा केल्याने आज सत्ताधारी पक्षाने विधिमंडळ डोक्यावर घेतले. आमदार अतुल भातखळकर यांच्यासह भाजपच्या आमदारांनी संजय राऊत यांच्यावर हक्कभंग आणण्यासाठी सभागृह आक्रमक भूमिका घेतली. एकापाठोपाठ एक भाजपचे आमदार संजय राऊतांवर ऊर बडवून बोलत होते. त्यांच्यावर हक्कभंग आणण्यासाठी वातावरणनिर्मिती करत होते. विरोधी पक्षनेते अजित पवार आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राऊतांच्या वक्तव्यावर भूमिका मांडत त्यांचं विधान चुकीचंच असल्याचं सांगत त्यांची पाठराखण करण्यास नकार दिला. सत्ताधारी-विरोधकांच्या चर्चेनंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी ८ मार्चला राऊतांच्या हक्कभंगावर निर्णय घेऊ, असं सूचित केलं.

गेल्या २० वर्षांपासून मी स्वत: देशातल्या सर्वोच्च सभागृहाचा सदस्य आहे. विधिमंडळ असो की संसद या दोन्ही कायदेमंडळाचा मी कायम आदर केलाय. राज्यसभेच्या कामकाजात सर्वाधिक काळ सहभागी होणारा मी सदस्य आहे. शिवेसनेने संसदीय लोकशाहीवर कायम विश्वास ठेवला आहे. आज जो काही माझ्याविरोधात गदारोळ झाला, असं मला कळलं. मुळात माझ्या भावना समजून घेतल्या पाहिजेत. मी कोणत्या संदर्भाने याचा सारासार विचार करायला हवा. माझ्यावर हक्कभंग आणण्याचा पूर्ण अधिकार सदस्यांना असू शकतो. त्यावर चर्चाही होईल, त्यावर मी उत्तर देईल. मी कोणत्या भावनेने बोललो, हे आधी समजून घेतले पाहिजे. एकांगी कारवाई करता कामा नये, असं राऊत म्हणाले.

विरोधकांनी देशद्रोही म्हटलं जातं. कालच सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश चंद्रचूड यांनी स्पष्ट केलं की ४० लोकांनी पक्ष सोडला. ज्या पद्धतीने शिवसेना आणि धनुष्यबाणाची चोरी करुन विधिमंडळात जाऊन सरकार स्थापन केलं आणि आता हल्ले करतायेत. विधिमंडळाच्या बाहेर त्यांचा उल्लेख चोर केला जातो, दरोडेखोर केला जातो. कालही बच्चू कडू यांना शेतकऱ्याने अडवलं आणि त्यांना गद्दार म्हटलं. मी त्यांना उद्देशून चोरबजार म्हटलं. ज्यांनी बेईमानी केली, ज्यांनी गद्दारी केली. या लोकांनी चोरी करुन विधिमंडळात पाय ठेवला. त्यांच्यामुळे विधिमंडळाची बदनामी होतेय चोरमंडळ म्हणून.. ती बदनामी थांबायला हवी, अशा हेतूने मी वक्तव्य केलं, असंही राऊतांनी स्पष्टीकरण दिलं.

सर्व सभागृहातील सदस्यांना मी उद्देशून बोललो नव्हतो. ज्याने शिवसेनेचा धनुष्यबाण चोरला ज्याने शिवसेना चोरली, ही भूमिका त्यांच्याविषयी आहे. ज्यांच्यावर सुप्रीम कोर्टाची अपात्रतेची टांगती तलवार आहे. ज्या विधिमंडळाने मला राज्यसभेत पाठवलं, त्यांच्याबद्दल मला आदर आहे, असंही राऊत म्हणाले.