त्यांच्या मृत्युचं भांडवल करू नये; मनसुख हिरेन यांच्या मृत्यूवर संजय राऊतांची प्रतिक्रिया
राजकारण

त्यांच्या मृत्युचं भांडवल करू नये; मनसुख हिरेन यांच्या मृत्यूवर संजय राऊतांची प्रतिक्रिया

मुंबई : “जर उपस्थित केलेले प्रश्न योग्य, मुद्देसूद असतील आणि त्यांच्याकडे काही माहिती असेल तर नक्कीच तपास व्हायला हवा. ज्या व्यक्तीचा मृत्यू झाला ती घटना धक्कादायक आणि दुर्दैवी आहे. ती आत्महत्या की हत्या याबाबतही लोकांच्या मनात शंका आहे. ती शंका लवकरात लवकर दूर होणं गरजेचं आहे. त्याच्या मृत्यूचं भांडवल करु नये.” अशी प्रतिक्रिया शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

देशातील सर्वात श्रीमंत उद्योजक मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील घराबाहेर २६ फेब्रुवारी रोजी जिलेटीन स्फोटकांनी भरलेले एक गाडी सापडली होती. सोबतच या गाडीत मुकेश अंबानी यांच्या कुटुंबियांसाठी धमकीचे पत्रही सापडले होते. त्यानंतर या प्रकरणाचा तपास सुरू असतानाच संबधित गाडीचे मालक मनसुख हिरेन यांचा मृतदेह मुंब्रा खाडीजवळ आढळून आल्याने चांगलीच खळबळ माजली आहे. मनसुख हिरेन यांनी आत्महत्या केल्याचं पोलीस सांगत असताना दुसरीकडे कुटुंबीय मात्र हा दावा फेटाळत आहेत.

यादरम्यान शिवसेना खासदार संजय राऊत यांनी यावर पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. मनसुख हिरेन यांच्या मृत्यूचं भांडवल करु नये. कारण ती निरपराध व्यक्त्ती आहे. त्याचा बळी कोणत्या कारणामुळे गेला आहे? त्याला कोण जबाबदार आहे? या सगळ्या गोष्टींबाबतचं सत्य जितक्या लवकर गृहखातं समोर आणेल तितकं हे या सरकारच्या प्रतिष्ठेसाठी आणि प्रतिमेसाठी योग्य ठरेल,” असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

तसेच, “विरोधी पक्षाने केंद्रीय तपास यंत्रणेकडे तपास देण्याची जी मागणी केली आहे त्यामुळे सत्य बाहेर येईल असं नाही. मुंबईचे पोलीस सक्षम आहेत. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी हा तपास एटीएसकडे दिला आहे. त्यातील सर्व अधिकारी उत्तम आहेत,” असं संजय राऊत यांनी म्हटलं.

त्याचबरोबर, “अधिवेशन सुरु असताना एका महत्वाच्या गुन्ह्यातील व्यक्ती किंवा साक्षीदाराचा मत्यू होणं हे नक्कीच धक्कादायक आहे. पण म्हणून विरोधी पक्षाने तपास पूर्ण होईपर्यंत सरकारला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करणं मला योग्य वाटत नाही. त्यांच्या कुटुंबाचा, पत्नीचा आक्रोश मला व्यथित करणारा आहे. त्याचप्रमाणे मुख्यमंत्री, गृहमंत्री यांनाही व्यथित करत असेल. त्यामुळे हे नक्की काय आहे हे बाहेर येणं गरजेचं आहे,” असं मत संजय राऊत यांनी व्यक्त केलं आहे.

दरम्यान, सचिन वाझे यांनी २००८ मध्ये शिवसेनेत प्रवेश केला होता त्यामुळे संशय निर्माण झाल्याच्या प्रश्नावर उत्तर देताना ते म्हणाले की, “मला तसं वाटत नाही. मी त्याच्याविषयी फार बोलणं योग्य नाही. एखाद्या अधिकाऱ्याचं नाव घेऊन असं बोलणं मला योग्य वाटत नाही”. असंही संजय राऊत यांनी स्पष्ट केलं आहे.