पंतप्रधानांचा एकच कायदा, देश फुंकून मित्रांचा फायदा; राहुल गांधींचा घणाघात
राजकारण

पंतप्रधानांचा एकच कायदा, देश फुंकून मित्रांचा फायदा; राहुल गांधींचा घणाघात

नवी दिल्ली : ” केंद्र सरकारची दोन्ही हातांनी दिवसा लूट. गॅस-डिझेल-पेट्रोलवर जबरदस्त कर वसूली आणि मित्रांना पीएसयू-पीएसबी विकून जनतेकडून हिस्सा, रोजगार आणि सुविधा हिरावून घेणं. पंतप्रधानांचा एकच कायदा, देश फुंकून मित्रांचा फायदा,” असं म्हणत कॉंग्रेस खासदार राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून पंतप्रधानांवर टीका केली

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

राहुल गांधी यांनी रविवारी पुन्हा एकदा मोदी सरकारवर पेट्रोल-डिझेलचे दर, सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांची विक्री आणि एलपीजी सिलिंडरच्या वाढत्या दरांवरून निशाणा साधला. तसंच यावेळी केंद्र सरकारकडून दिवसा लूट केली जात असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमतींवर काँग्रेसने सातत्याने केंद्रसरकारवर टीका केली आहे. सरकारनं २०१४ मध्ये सत्तेत आल्यानंतर पेट्रोलियम उत्पादनांवर कर लावून २१ लाख कोटी रूपयांपेक्षा अधिक महसूल गोळा केला असल्याचा दावा काँग्रेसने केला आहे.

दरम्यान, मध्य प्रदेशातील अनुपपूर आणि राजस्थानमधील श्री गंगानगर या ठिकाणी इंधनाच्या दरानं शंभरी पार केली आहे. तर दुसरीकडे एलपीजी सिलिंडरच्या दरातही मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून सामान्यांच्या खिशावर याचा ताण पडत आहे. तर २०२१ या वर्षाच्या सुरूवातीच्या दोन महिन्यांमध्ये पेट्रोलच्या दरात ४.८७ रूपये प्रति लिटर आणि डिझेलच्या दरात ४.९९ रूपये प्रति लिटर वाढ करण्यात आली आहे. यामुळे संसदेतही काँग्रेसनं यावरून गदारोळ केला होता.