पक्षीय मतभेद जरूर असावेत पण मनभेद नसावेत; रोहित पवारांकडून पंतप्रधान मोदींचे कौतुक
राजकारण

पक्षीय मतभेद जरूर असावेत पण मनभेद नसावेत; रोहित पवारांकडून पंतप्रधान मोदींचे कौतुक

मुंबई : “राज्यसभेत विरोधी पक्षातील नेत्यांबद्दल बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदीसाहेब भावूक झाल्याचं पहायला मिळालं. ‘पक्षीय मतभेद जरूर असावेत पण मनभेद नसावेत’, या भारतीय राजकारणातील आपल्या पूर्वसूरींनी घालून दिलेला मार्गावरून मोदीजींना चालताना पाहून आनंद वाटला”. असे ट्वीट करत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भावनांचे कौतुक केले आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

खरतरं, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांच्यासह राज्यसभेतील चार सदस्यांना सभागृहात निरोप देण्यात आला. दरम्यान गुलाम नबी आझाद यांच्यासोबतच्या आठवणींना सभागृहातील सदस्यांनी उजाळा दिला. गुलाम नबी आझाद यांचं कौतुक करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी भावूक झाल्याचं पहायला मिळालं. गुलाम नबी आझाद यांच्याबद्दलचा आठवणींना उजाळा देताना मोदींच्या डोळ्यातून अश्रू ओघळले. पंतप्रधान मोदींच्या याच भावनांचे रोहित पवारांनी कौतुक केले आहे.

नक्की काय म्हणाले होते पंतप्रधान मोदी राज्यसभेत?
“जेव्हा आपण (गुलाम नबी आझाद) मुख्यमंत्री होता. मी पण एका राज्याचा मुख्यमंत्री (गुजरात) म्हणून काम करत होतो. आपले जवळचे संबंध होते. एकदा गुजरातच्या यात्रेकरूंवर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. जवळपास आठ लोक मारले गेले होते. त्यावेळी मला गुलाम नबी यांचा सर्वात आधी फोन आला होता. त्यावेळी तो फोन फक्त माहिती देण्यासाठी नव्हता. त्यांचे अश्रू थांबत नव्हते. त्यानंतर मी तत्कालिन संरक्षणमंत्री प्रणव मुखर्जी यांना फोन केला. त्यांना मृतदेह आणण्यासाठी विमान उपलब्ध करून देण्याची मागणी केली. त्यांनी व्यवस्था करतो असं सांगितलं.

त्यानंतर रात्रीही ते विमानतळावर होते. गुलाम नबी यांनी विमानतळावरून पुन्हा कॉल केला. त्यावेळी एखादा माणूस जसा कुटुंबातील व्यक्तीची चिंता करतो, तशीच चिंता ते करत होते. पद, सत्ता जीवनात येत-जात राहते. ती सांभाळता आली पाहिजे. माझ्यासाठी तो फार भावूक क्षण होता. दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांनी पुन्हा फोन केला आणि विचारलं सगळे लोक पोहोचलेत ना? त्यामुळे त्यांच्याविषयी माझ्या मनात आदर आहे,” असं म्हणताना मोदींना अश्रू आवरता आले नाहीत.