तीरथ रावत उत्तराखंडचे नवे मुख्यमंत्री
राजकारण

तीरथ रावत उत्तराखंडचे नवे मुख्यमंत्री

नवी दिल्ली : त्रिवेंद्र सिंह रावत यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर चर्चेत असलेल्या नावांना मागे टाकत तीरथ सिंह रावत यांनी उत्तराखंडचे दहावे मुख्यमंत्री म्हणून सूत्रे स्वीकारली आहेत. भाजपच्या बैठकीत त्यांची सभागृह नेतेपदी निवड करण्यात आली होती.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

उत्तराखंडमध्ये मागील काही दिवसांपासून राजकीय संकट निर्माण झालं होतं. त्रिवेंद्र सिंह रावत यांच्यावर पक्ष नाराज असल्याची चर्चा सुरू होती. भाजप आमदारांनी रावत यांच्याबद्दल पक्षाकडे नाराजीचा सूर लावत तक्रार केली होती. त्यातच त्यांना राजीनामा देण्याचे आदेश देण्यात आल्याचंही समोर आलं होतं. या चर्चा सुरू असतानाच रावत यांची मंगळवारी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्यासोबत बैठक झाली. या बैठकीनंतर रावत यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा राज्यपालांकडे सुपूर्द केला.

रावत यांच्या राजीनाम्यानंतर त्यांचा उत्तराधिकारी कोण, अशी चर्चा सुरू होती. यात रावत यांच्या मंत्रिमंडळात असलेले धनसिंह रावत, लोकसभा खासदार अजय भट्ट, राज्यसभा खासदार अनिल बलूनी आणि महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या नावांची चर्चा होती. त्यापैकी एका नावाची निवड केली जाण्याच्या शक्यता होती. मात्र भाजपच्या देहरादून येथे झालेल्या बैठकीत चारही नावे बाजूला ठेवण्यात आली आणि तीरथ सिंह रावत यांची निवड करण्यात आली. तीरथ सिंह रावत हे उत्तराखंडमधील गढवाल लोकसभा मतदारसंघाचं लोकसभेत प्रतिनिधित्व करतात. खासदार तीरथ रावत हे उत्तराखंड भाजपचे प्रदेशाध्यक्षही राहिलेले आहेत. रावत सध्या भाजपचे राष्ट्रीय सचिव आहेत. काल (ता. १०) त्यांनी उत्तराखंडचे दहावे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.