भाजपच्या ‘या’ मुख्यमंत्र्यांना द्यावा लागणार राजीनामा; लवकरच नवीन नावाची घोषणा
राजकारण

भाजपच्या ‘या’ मुख्यमंत्र्यांना द्यावा लागणार राजीनामा; लवकरच नवीन नावाची घोषणा

नवी दिल्ली : उत्तराखंडचे मुख्यमंत्री तिरथ सिंग रावत यांना पदावरून पायउतार होण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. तिरथ सिंग हे सध्या दिल्ली दौऱ्यावर असून त्यांनी काही वेळापूर्वीच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा यांची भेट घेतली. सुमारे 40 मिनिटं चाललेल्या या बैठकीनंतर तिरथ सिंग रावत यांना राजीनामा देण्याचे आदेश मिळाल्याची माहिती मिळत आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

तिरथ सिंग यांच्या जागी कुणाची वर्णी लागणार हे पुढच्या 24 ते 36 तासांत स्पष्ट होईल, अशीही माहिती भाजपमधील सूत्रांकडून मिळली आहे. डेहरादूनमध्ये शनिवारी किंवा रविवारी भाजपच्या सर्व आमदारांची बैठक होईल आणि हे आमदार आपला नवा सभागृह नेता निवडतील, असं सांगण्यात येत आहे. आता मुख्यमंत्रीपदी कुणाची वर्णी लागणार, याबाबत तर्कवितर्क सुरू झाले आहेत.

नुकतेच मुख्यमंत्रीपदी वर्णी लागलेल्या तीरथ सिंग रावत यांना अचानक दिल्लीतून बोलावणं आल्यामुळं ते दिल्ली दरबारी दाखल झाले. त्यांनी अमित शाह आणि जे. पी. नड्डा यांची भेट घेतली. भाजपचे दुसरे स्थानिक नेते सतपाल महाराज आणि धन सिंग रावत यांनादेखील दिल्लीत बोलावण्यात आलं. पक्षाध्यक्षांसोबतच्या बैठकीनंतर तीरथ सिंग शनिवारी लगेच डेहरादूनला परत जाणार होते. मात्र, त्यांचा परतीचा कार्यक्रमही रद्द झाला असून त्यांना दिल्लीतच थांबवण्याचे आदेश मिळाल्याची माहिती मिळत आहे. तीरथ सिंग रावत यांनी 10 मार्च रोजी उत्तराखंडच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. चार महिने व्हायच्या आत त्यांना पदावरून पायउतार व्हावं लागत आहे.