ईडी’च्या एका नोटीसने शिवसेना हादरली; भाजपा नेत्याचा शिवसेनेवर हल्लाबोल
राजकारण

ईडी’च्या एका नोटीसने शिवसेना हादरली; भाजपा नेत्याचा शिवसेनेवर हल्लाबोल

मुंबई : ‘ईडी’कडून केवळ एक नोटीस आली आणि पक्ष हादरला, पक्ष घाबरला”, अशा शब्दात भाजपा नेते राम कदम यांनी शिवसेना आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांचा समाचार घेतला. दोन दिवसांपासून संजय राऊत भाजपाला लक्ष्य करताना दिसत असताना ‘सामना’च्या अग्रलेखातूनही शिवसेनेने भाजपावर टीकास्त्र सोडलं. त्यानंतर, भाजपा नेत्यांनी शिवसेना व संजय राऊतांवर जोरदार टीका केली.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

भाजपाचे आशिष शेलार, केशव उपाध्ये, किरीट सोमय्या, अतुल भातखळकर यांच्यानंतर राम कदम यांनी शिवसेनेचा समाचार घेतला. “नोटीशीला घाबरायचं काय कारण? कर नाही त्याला डर कशाला? आणि जर काही कारणाने घाबरले असाल तर याचा अर्थ नक्कीच काही तरी गौडबंगाल आहे. कुठेतरी पाणी मुरतंय हे समजायला महाराष्ट्राची जनता निश्चितपणे हुशार आहे”, असा टोलाही त्यांनी लगावला.

खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ‘ईडी’ने नोटीस बजावल्यापासून मोदी सरकार आणि भाजपा विरोधात शिवसेनेने टीकेचा सूर लावला आहे. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे जोपर्यंत ‘सामना’मध्ये लिहित होते तोपर्यंत ते एक वर्तमानपत्र होतं. आता मात्र ते केवळ एका पक्षाची जाहिरात करण्यासाठी सुरू असलेलं हॅण्डबिल आहे. सामनामध्ये हल्ली राम मंदिराबरोबरच बाबरी मशीदचाही उल्लेख होतो. राम मंदिराचा निर्णय लवकर लागू नये म्हणून ज्या काँग्रेस पक्षाने वकिलांची फौज उभारली, त्याच हिंदुत्वविरोधी काँग्रेससोबत शिवसेना सत्तेत आहे. ही दुटप्पी भूमिका कशी चालेल? ‘ईडी’कडून केवळ एक नोटीस आली आणि पक्ष हादरला, पक्ष घाबरला”, अशा शब्दात राम कदम यांनी शिवसेना आणि संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे.