भारताच्या पहिल्या महिला क्रिकेट समालोचक काळाच्या पडद्याआड
क्रीडा

भारताच्या पहिल्या महिला क्रिकेट समालोचक काळाच्या पडद्याआड

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेटमधील पहिल्या महिला समालोचक चंद्रा नायडू यांचे वयाच्या 88व्या वर्षी प्रदीर्घ आजाराने निधन झाले. देशाचे पहिले कसोटी कर्णधार सी. के. नायडू यांच्या त्या मुलगी होत्या. माजी क्रिकेटपटू विजय नायडू यांनी सांगितले, की मनोरामगंज येथील त्यांच्या घरी चंद्रा नायडू यांनी अखेरचा श्वास घेतला.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

भारत-इंग्लंड यांच्यात 1982मध्ये लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर झालेल्या सुवर्ण महोत्सवी कसोटी सामन्यात चंद्रा नायडू साक्षीदार होत्या. त्यांनी आपल्या वडिलांच्या जीवनावर सीके नायडू : ए डॉटर रिमेम्बर्स नावाचे पुस्तक लिहिले.

चंद्रा नायडू या दीर्घ आजारांशी झुंज देत होत्या आणि आजारपणामुळे त्यांना चालणेही अशक्य झाले होते. त्या अविवाहित होत्या. क्रिकेट तज्ज्ञांच्या मते, चंद्रा नायडू भारताच्या सुरुवातीच्या महिला समालोचकांपैकी एक होत्या. राष्ट्रीय चॅम्पियन्स बॉम्बे आणि एमसीसीच्या संघांदरम्यान इंदूर येथे 1977मध्ये झालेल्या क्रिकेट सामन्यात त्यांनी प्रथमच समालोचन केले होते. त्यानंतर समालोचक म्हणून त्या जास्तकाळ सक्रिय राहिल्या नाही. त्यांनी इंदुरमधील शासकीय कन्या महाविद्यालयात इंग्रजी विषयाच्या प्राध्यापक म्हणून काम केले होते.