पांड्या-जडेजा जोडीची धमाल; मोडला ३५ वर्षांपूर्वीचा विक्रम
क्रीडा

पांड्या-जडेजा जोडीची धमाल; मोडला ३५ वर्षांपूर्वीचा विक्रम

सिडनी : भारताविरुद्ध तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी सुरेख कामगिरी करताना टीम इंडियाच्या धावगतीवर अंकुश ठेवला होता. पण, हार्दिक पांड्या व रवींद्र जडेजा यांनी सर्व चित्रच बदललं. हार्दिक-रवींद्रने विक्रमी कामगिरी केली.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

हार्दिक पांड्या आणि रवींद्र जडेजा यांनी सहाव्या विकेटसाठी १५० धावांची भागीदारी करताना संघाला समाधानकारक पल्ला गाठून दिला. हार्दिकनं मालिकेतील सलग दुसरे आणि कारकिर्दीतील ६वे अर्धशतक पूर्ण केले. जडेजानेही १३वे अर्धशतक पूर्ण करून हार्दिकला तोडीसतोड साथ दिली.

ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्यांच्याच घरच्या मैदानावर सहाव्या विकेटसाठी हार्दिक-रवींद्रने १५० धावांची भागीदारी केली. या जोडीनं श्रीलंकेच्या डी मेंडिस व अरविंद डी सिल्वा यांनी १९८५साली सहाव्या विकेटसाठी नोंदवलेला १३९ धावांचा विक्रम मोडला. भारतासाही सहाव्या विकेटसाठी ही तिसरी सर्वोत्तम भागीदारी ठरली. अंबाती रायुडू व स्टुअर्ट बिन्नी यांनी २०१५ मध्ये झिम्बाब्वेविरुद्ध १६०, तर महेंद्रसिंग धोनी आणि युवराज सिंग यांनी २००५ मध्ये झिम्बाब्वेविरुद्ध १५८ धावांची भागीदारी केली होती.

त्याचबरोबर, ऑस्ट्रेलियाविरुद्ध १९९९ मध्ये सदगोपन रमेश आणि रॉबिन सिंग यांनी १२३ धावांची भागीदारी केली होती. तो विक्रम आज हार्दिक-रवींद्र जोडीनं तोडला. या दोघांच्या फटकेबाजीच्या जोरावर टीम इंडियानं ५ बाद ३०२ धावा केल्या. हार्दिक ७६ चेंडूंत ७ चौकार व १ षटकारासह ९२ धावांवर, तर रवींद्र ५० चेंडूंत ५ चौकार व ३ षटकारांसह ६६ धावांवर नाबाद राहिला. १९९१-९२नंतर ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर प्रथमच भारतीय संघाकडून वन डे मालिकेत एकही वैयक्तित शतकी खेळी झाली नाही. तसेच ऑस्ट्रेलियाविरुद्ध वन डे मालिकेत एकाही भारतीय फलंदाजांना शतकी खेळी करता न आल्याची ही पहिलीच वेळ आहे.