शेवटच्या षटकांत महागड्या ख्रिस मॉरिसची फटकेबाजी; राजस्थानचा विजय!
क्रीडा

शेवटच्या षटकांत महागड्या ख्रिस मॉरिसची फटकेबाजी; राजस्थानचा विजय!

नवी दिल्ली : राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसननं नाणेफेक जिंकून दिल्ली कॅपिटल्सला फलंदाजीसाठी पाचारण केलं. उत्तरादाखल २० ओव्हर्समध्ये दिल्ली कॅपिटल्सनं १४७ धावापर्यंतच मजल मारता आली. विजयासाठी १४८ धावांचं लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या राजस्थान रॉयल्सनं सुरुवात संथ केली. वरच्या फळीचे फलंदाज अपयशी ठरल्यानंतर खाली आलेल्या डेविड मिलर आणि ख्रिस मॉरिसने फटकेबाजी करत राजस्थानला विजय मिळवून दिला.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

१४८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पहिल्या २ ओव्हरमध्ये अवघ्या ५ धावा राजस्थाननं केल्या. पण पुढच्या २ ओव्हरमध्ये राजस्थानच्या ३ विकेट्स पडल्या. तिसऱ्या ओव्हरच्या चौथ्या बॉलवर ख्रिस वोक्सनं दिल्लीला पहिली विकेट मिळवून दिली. ९ धावांवर मनन वोराला वोक्सनं रबाडाकरवी झेलबाद केलं. त्यानंतर जोस बटलरला रिषभ पंतकरवी झेलबाद केलं. यानंतर वोहराचा अप्रतिम झेल घेणाऱ्या रबाडाने गोलंदाजी करताना कर्णधार संजू सॅमसनचा मोठा अडथळा दूर केला. त्यामुळे राजस्थानची चौथ्याच षटकात १७ धावांवर ३ विकेट अशी अवस्था झाली.

डेविड मिलरनं शिवम दुबेला साथीला घेत राजस्थानच्या डावाला आकार द्यायला सुरुवात केली खरी परंतु, आठव्या षटकात आवेश खानच्या गोलंदाजीवर शिखर धवनने स्लीपमध्ये शिवम दुबेचा झेल टिपला. २ धावांवर शिवम दुबे माघारी परतला. त्याचबरोबर परागही २ धावांवर झेलबाद झाला. यानंतर आलेल्या राहुल तेवतियाला साथीला घेत डेविड मिलरनं राजस्थानचा डाव सावरला. मात्र, राहुल तेवतिया १९ धावांवर बाद झाला. त्यानंतर डेविड मिलरनं आपलं अर्धशतक पूर्ण करत आवेश खानच्या गोलंदाजीवर चुकीचा फटका खेळून बाद झाला. मात्र, यानंतर ख्रिस मॉरिसनं शेवटच्या षटकांमध्ये जोरदार फटकेबाजी करत राजस्थानला विजयासाठी १३ धावांची गरज असताना षटकार खेचून सामना खिशात घातला. अवघ्या १८ चेंडूंमध्ये ख्रिस मॉरिसनं ३६ धावा त्याने केल्या.

तत्पूर्वी, दिल्लीच्या डावाच्या दुसऱ्याच षटकामध्ये जयदेव उनाडकटनं धोकादायक पृथ्वी शॉला ५ धावांवर माघारी धाडलं. त्यापाठोपाठ चौथ्या ओव्हरमध्ये पहिल्याच बॉलवर जयदेव उनाडकटनं दिल्लीचा दुसरा सलामीवीर शिखर धवनला बाद केलं. शिखर धवननंतर मैदानात उतरलेला अजिंक्य रहाणे पुन्हा उनाडकटच्या गोलंदाजीवर त्यालाच झेल देऊन माघारी परतला. त्यामुळे ६ ओव्हर्सनंतर दिल्लीची अवस्था ३६ धावांवर ३ विकेट अशी झाली. उनाडकटपाठोपाठ मुस्तफिझूरनं देखील आपली करामत दाखवत धोकादायक मार्कस स्टॉयनिसला अप्रतिम बॉलवर मॉरिसकरवी झेलबाद केलं.

त्यानंतर ललित यादवला साथीला घेऊन कर्णधार रिषभ पंतनं डावाला आकार द्यायला सुरुवात केली. अवघ्या ३० चेंडूंमध्ये रिषभ पंतनं ५० धावा फटकावल्या. मात्र, रियान परागनं आपल्याच बॉलिंगवर एकेरी धाव घेण्याच्या प्रयत्नात असलेल्या रिषभ पंतला धावचीत करून माघारी पाठवलं. रिषभ पंतसोबत डाव सावरणारा ललित यादव २० धावांवर असताना मॉरिसच्या गोलंदाजीवर उत्तुंग फटका मारताना बाद झाला. राहुल तेवतियानं त्याचा अप्रतिम झेल टिपला! शेवटच्या फलंदाजांनी केलेल्या छोट्या भागीदाऱ्यांच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्सनं राजस्थान रॉयल्ससमोर विजयासाठी १४८ धावांचं लक्ष्य ठेवलं होतं!