आरसीबीला मोठा झटका; अष्टपैलू खेळाडूला कोरोनाची लागण
क्रीडा

आरसीबीला मोठा झटका; अष्टपैलू खेळाडूला कोरोनाची लागण

बंगळुरु : विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बँगलोर संघाला एक मोठा झटका बसला असून संघाचा अष्टपैलू खेळाडू डॅनियल सॅम्सचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्याच्याआधी सलामीवीर देवदत्त पडिकललाही कोरोनाची लागण झाली होती, पण त्याने आता कोरोनावर मात केली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

रॉयल चॅलेंजर्स बँगलोरने ट्विटरद्वारे सॅम्सला कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिली. तसेच, तो सध्या आयसोलेशनमध्ये असल्याचंही सांगण्यात आलं. बीसीसीआयच्या सर्व नियमांचं पालन केलं जात असून आरसीबीची मेडिकल टीम सॅम्सच्या संपर्कात आहे, व त्याच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहे. ३ एप्रिल रोजी पहिल्यांदा भारतात आल्यावर सॅम्सने चेन्नईतील हॉटेलमध्ये चेक-इन केले. त्यावेळी त्याचा कोरोनाचा रिपोर्ट निगेटीव्ह आला होता. पण ७ एप्रिल रोजी त्याचा कोरोना चाचणीचा दुसरा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. सॅम्सचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे, पण त्याला कोरोनाची लक्षणं दिसत नाहीत. सध्या त्याला आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आलं आहे, अशी माहिती आरसीबीने दिली आहे.

आयपीएल सुरू होण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक असताना कोरोनाची लागण झाल्याने सॅम्स सुरूवातीच्या काही सामन्यांना मुकण्याची शक्यता आहे. डॅनियल सॅम्स ऑस्ट्रेलियाकडून चार टी-20 सामन्यात खेळलाय. तर, गेल्या हंगामात दिल्ली कॅपिटल्सच्या संघातून खेळताना त्याने उल्लेखनीय कामगिरी केली होती. मात्र, यंदाच्या लिलावात दिल्लीने त्याला मुक्त केले, त्यानंतर आरसीबीने सॅम्सला आपल्या ताफ्यात घेतलं आहे.