फायनलमध्ये एक गडी बाद करत इशांत शर्माने केले दोन विक्रम
क्रीडा

फायनलमध्ये एक गडी बाद करत इशांत शर्माने केले दोन विक्रम

नवी दिल्ली : भारताचा जलदगती गोलंदाज इशांत शर्माने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये एक गडी बाद करत दोन मोठे विक्रम आपल्या नावांवर केले आहेत. न्यूझीलंडचा सलामीवीर फलंदाज डेव्हॉन कॉन्वेला त्याने बाद केले. कॉन्वेला माघारी धाडत त्याने आपल्या नावावर दोन विक्रमांची नोंद केली.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

पहिला विक्रम म्हणजे भारतीय संघाचा दिग्गज माजी गोलंदाज कपिल देव यांना त्याने मागे टाकले. इशांतने इंग्लंडमध्ये ४४ विकेट्स घेतल्या आहेत. अशा प्रकारे तो इंग्लंडमधील सर्वाधिक विकेट घेणारा भारतीय गोलंदाज ठरला. त्याने आतापर्यंत १३ सामन्यांच्या २० डावात ४४ विकेट्स घेतल्या आहेत. त्याने दोन वेळा एका डावात पाच विकेट घेण्याचा पराक्रम केला आहे. इशांतने कपिल देव यांना मागे टाकले. कपिल देव यांनी इंग्लंडमध्ये ११ सामन्यांच्या २२ डावांमध्ये ४३ बळी घेतले होते. या विक्रमात भारताचा दिग्गज माजी फिरकीपटू अनिल कुंबळे (३६) तिसर्‍या, बिशनसिंग बेदी (३५) चौथ्या आणि झहीर खान (३१) पाचव्या क्रमांकावर आहेत.

त्याचबरोबर दुसरा मोठा विक्रम म्हणजे इशांत शर्माने भारताबाहेर कसोटीत २०० बळी पूर्ण करण्याचा विक्रम केला आहे. असा विक्रम करणारा तो चौथा भारतीय गोलंदाज ठरला आहे. इशांतने ६१ सामन्यात २०० बळी घेतले आहेत. त्याने ९वेळा पाच गडी आणि एकदा १० गडी बाद करण्याचा पराक्रम केला आहे. ७४ धावांत ७ बळी ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. याशिवाय अनिल कुंबळे (२६९), कपिल देव (२१५) आणि झहीर खान (२०७) यांनीही परदेशी मैदानावर २०० हून अधिक बळी घेतले आहेत.