जडेजाचा खास विक्रम; धोनी-कोहलीच्या सोबत मिळालं स्थान
क्रीडा

जडेजाचा खास विक्रम; धोनी-कोहलीच्या सोबत मिळालं स्थान

मेलबर्न : मेलबर्न येथे झालेला कसोटी सामना रविंद्र जडेजाचा ५०वा कसोटी सामना होता. जडेजानं ५० कसोटी सामने खेळतानाच एम. एस. धोनी आणि विराट कोहलीच्या पंगतीत स्थान मिळवलं आहे. एकदिवसीय सामने, टी-२० आणि कसोटी या तिन्ही प्रकारात ५० किंवा त्यापेक्षा जास्त सामने खेळणारा रविंद्र जाडेजा तिसरा भारतीय खेळाडू ठरला आहे. जडेजानं ट्विट करत आनंदही व्यक्त केला आहे. ट्विटमध्ये जाडेजा म्हणाला की, माही भाई आणि विराटच्या पंगतीत स्थान मिळाल्याचा आनंद आहे. माझ्यासाठी हा एक मोठा सन्मान आहे. बीसीसीआय, संघ सहकारी आणि सपोर्ट स्टाप यांनी माझ्यावर दाखवलेल्या विश्वासासाठी धन्यवाद… आशाही यापुढेही असेच सुरु राहिल. जय हिंद. अशा आशयाचे ट्विट त्याने केले आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

२००९ मध्ये रविंद्र जाडेजानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. त्यानं आतापर्यंत ५० कसोटी, ५० टी-२० आणि १६८ एकदिवसीय सामन्यात भारतीय संघाचं प्रतिनिधित्व केलं आहे. कसोटीत २१६, एकदिवसीय सामन्यात १८८ आणि टी-२० मध्ये ३९ विकेट जडेजाच्या नावावर आहेत. तर कसोटीत १९२६ धावा, एकदिवसीय सामन्यात २४११ आणि टी-२० मध्ये २१७ धावा जाडेजाच्या नावावर आहेत.

दरम्यान, बॉक्सिंग-डे कसोटीत भारताच्या विजयात रविंद्र जडेजाची भूमिका महत्वाची होती. पहिल्या डावांत फलंदाजी करताना जाडेजानं ५७ धावाची महत्वपूर्ण खेळी केली होती. तर गोलंदाजीत एक बळी मिळवला होता. त्यानंतर दुसऱ्या डावात गोलंदाजी करताना जाडेजानं दोन बळी मिळवले होते. पहिल्या डावांत संघ अडचणीत असताना कर्णधार रहाणेसोबत १२१ धावांची महत्वपूर्ण भागिदारी केली. त्यामुळेच भारतीय संघाला मोठी आघाडी घेण्यात यश मिळालं.