दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई; कुस्तीपटू सुशील कुमारला अटक
क्रीडा

दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई; कुस्तीपटू सुशील कुमारला अटक

नवी दिल्ली : दोन ऑलिम्पिक पदके विजेता कुस्तीपटू सुशील कुमारला दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने अटक केली आहे. छत्रसाल स्टेडियमवर ४ मेच्या रात्री झालेल्या मारहाणीच्या घटनेत २३ वर्षीय कनिष्ठ राष्ट्रीय विजेता कुस्तीपटू सागर राणाची हत्या झाली, तर सोनू आणि अमित कुमार जखमी झाले. या प्रकरणी सुशीलकुमारला दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

छत्रसाल स्टेडियमवरील २३ वर्षीय सागर राणा हत्या आणि मारहाण प्रकरणात आरोपी असलेल्या सुशिलकुमारचा आणि त्याच्या नऊ साथीदारांचा दिल्ली पोलिसांकडून शोध सुरू होता त्यानंतर सुशिल कुमार फरार होता. त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली आहे. सुशिलकुमारने अटकपूर्व जामीनासाठीही प्रयत्न केले होते. परंतु, न्यायालयाने त्याचा अटकपूर्व जामीन नामंजूर केला होता. दिल्ली पोलिसांनी पंजाबमध्ये जाऊन अटक केली आहे. सुशील कुमारला जालंधर येथून अटक केल्याची बातमी टाइम्स ऑफ इंडियाने वृत्तसंस्थेच्या हवाल्याने दिली आहे. सुशील कुमारला अटक केल्याची दिल्ली पोलिसांनी अधिकृतपणे माहिती अद्याप दिलेली नाही.

दरम्यान, दिल्ली पोलिसांनी सुशील कुमारची माहिती देण्याऱ्याला १ लाखाचे बक्षीसही जाहीर केले होते. त्याचबरोबर या प्रकरणातील सुशीलचा साथीदार अजय कुमार याची माहिती देणाऱ्यालाही ५० हजारांचे बक्षिस देण्याचे दिल्ली पोलिसांनी जाहीर केले होते.