ममता बॅनर्जीचा ‘योद्धा’ भाजपच्या गोटात; निवडणुकांच्या तोंडावर पश्चिम बंगालमध्ये राजकारण तापलं
राजकारण

ममता बॅनर्जीचा ‘योद्धा’ भाजपच्या गोटात; निवडणुकांच्या तोंडावर पश्चिम बंगालमध्ये राजकारण तापलं

नवी दिल्ली : ममता बॅनर्जी या कुणाच्याच नाहीत. मात्र एक गोष्ट खात्रीने सांगतो, २०२१ मध्ये होणारी निवडणूक तृणमूल काँग्रेस जिंकणार नाही, असे म्हणत तृणमूलचे माजी नेते सुवेंदू अधिकारी यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर टीका केली. आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत सुवेंदू अधिकारी यांनी भाजपात प्रवेश केला तेव्हा त्यांनी ममता बॅनर्जींवर कडाडून टीका केली.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

यावेळी बोलताना अधिकारी म्हणाले की, ”तृणमूल काँग्रेसमध्ये मला प्रचंड मानसिक छळाला सामोरं जावं लागलं. त्यावेळी ज्या नेत्यांनी मला त्रास दिला ते आता मला पाठीत खंजीर खुपसणारा माणूस अशी उपमा देत आहेत. ममता बॅनर्जी या कुणाच्याच नाहीत. मात्र एक गोष्ट खात्रीने सांगतो.. २०२१ मध्ये होणारी निवडणूक तृणमूल काँग्रेस जिंकणार नाही असं म्हणत सुवेंदू अधिकारी यांनी ममता बॅनर्जींवर टीका केली आहे.

दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा दोन दिवसांच्या पश्चिम बंगाल दौऱ्यावर शुक्रवारी रात्रीच दाखल झाले असून आज मेदिनीपूर येथील सभेद्वारे त्यांनी तृणमूल काँग्रेसला तगडा झटका दिला आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा ‘योद्धा’ अशी ओळख असलेले माजी मंत्री सुवेंदू अधिकारी यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. सुवेंदू यांच्यासह पश्चिम बंगालमधील ९ विद्यमान आमदार भाजपात सहभागी झाले असून त्यात तृणमूलच्या ५ आमदारांचा समावेश आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासाठी हा धक्का मानला जातो आहे.

विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर पश्चिम बंगालमध्ये राजकारण चांगलंच तापलं आहे. ममता बॅनर्जी विरुद्ध भाजप या संघर्षाला अधिकच धार चढताना दिसत आहे. शहा यांनी ममतांना या दौऱ्यात एकाचवेळी अनेक धक्के दिले आहेत. मेदिनीपूर येथे आयोजित करण्यात आलेल्या सभेला मोठी गर्दी झाल्याचे पाहायला मिळाले. याच सभेत सुवेंदू अधिकारी यांच्यासह तृणमूलचे अनेक प्रमुख नेते भाजपात सहभागी झाले असून भाजपला त्यामुळे अधिकच बळ मिळालं आहे.