कोरोना लसीकरणाबाबत केंद्रीय आरोग्य मंत्र्यांची मोठी घोषणा
कोरोना इम्पॅक्ट

कोरोना लसीकरणाबाबत केंद्रीय आरोग्य मंत्र्यांची मोठी घोषणा

नवी दिल्ली : देशात काही राज्यांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा सातत्याने वाढताना दिसत आहे. तर देशभरात जानेवारी महिन्यापासून कोरोना लसीकरणाला सुरवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. देशातील कोरोना लसीकरणाचा वेग देशभरातील नागरिक आता दिवसाच्या २४ तासांत कधीही आपल्या सोईनुसार कोरोनावरील लस घेऊ शकतील. असा निर्णय केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी जाहीर केला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

केंद्र सरकारने १ मार्चपासून देशभरातील ६० वर्षांवरील नागरिक आणि ४५ वर्षांवरील सहव्याधी असलेल्या व्यक्तींना लस देण्यास सुरुवात करण्यात आली आहे. याबाबत केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यासंदर्भात केलेल्या ट्विटमध्ये म्हणाले की, केंद्र सरकारने कोरोना लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी लसीकरणासाठी असलेली वेळमर्यादा समाप्त करण्याचा निर्णय घेतला आहे. देशातील नागरिक आता दिवसाच्या २४ तासांत कधीही लस घेऊ शकतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील नागरिकांच्या आरोग्यासोबतच त्यांच्या वेळेचे महत्त्वही जाणतात.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आपल्या तात्पुरत्या आकडेवारीमध्ये दिलेल्या माहितीनुसार, कोविड-१९ विरोधात देशव्यापी लसीकरण मोहीम १६ जानेवारीपासून सुरू झाली होती. सुरुवातीला आरोग्य कर्मचाऱ्यांना आणि २ फेब्रुवारीपासून अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना लसीकरणाची सुरुवात झाली होती. कोरोना लसीकरणाला सुरुवात झाल्यापासून देशभरात आतापर्यंत १.५४ कोटी नागरिकांना कोरोनाची लस देण्यात आली आहे. या आकडेवारीमध्ये मंगळवारी देण्यात आलेल्या सहा लाख ९ हजार ८४५ लसींचाही समावेश आहे.

आरोग्य मंत्रालयाने याबाबत माहिती देताना मंगळवारी संध्याकाळपर्यंत गोळा झालेल्या अंदाजित आकडेवारीनुसार, आतापर्यंत १ कोटी ५४ लाख ६१ हजार ८६४ जणांना कोरोनावरील लस देण्यात आली आहे. १ मार्चपासून ६० वर्षांवरील व्यक्ती आणि गंभीर आजारांनी ग्रस्त ४५ वर्षांवरील नागरिकांना लसीकरणाची सुरुवात करण्यात आली होती. यामध्ये ६० वर्षांपेक्षा अधिक वयाच्या ४ लाख ३४ हजार ९८१ लाभार्थ्यांचा आणि गंभीर आजारांनी ग्रस्त असलेल्या ४५ वर्षांवरील ६० हजार ०२० व्यक्तींचा समावेश आहे.